ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 19 सप्टेंबर : पाचोऱ्यात पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत एका व्यक्तीकडे तब्बल १८ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई दिनांक 18 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता करण्यात आली. याप्रकरणी सोहेल शेख तय्युब शेख, (वय. 24 वर्षे, रा. स्मशानभूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा) यास अटक करण्यात आली असून पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना पाचोरा शहरात विक्रीसाठी तलवारी आणल्या आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली. यानंतर माहिजी नाका परिसरात सोहेल शेख तय्युब शेख नामक तरूण हा तलवारींची विक्री करण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि विक्री करण्यासाठी आणलेल्या एकुण 18 तलवारी किंमत अंदाजे 54 हजार रुपये ह्या लपवुन ठेवलेल्या ठिकाणावरुन काढून दिल्या.
तसेच काही तलवारी त्याने विक्री केल्या आहेत, असे सांगितले. याप्रकरणी सोहेल शेख तय्युब शेख याच्याविरोधात पाचोरा पोलीस ठाणे गु. रजि. क्रमांक 460/2025 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4, 25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 97(1) (3), 135 प्रमाणे आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी अन्वये दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत.
यांनी केली कारवाई –
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनिरीक्षक कृष्णा घायाळ, कैलास ठाकुर, पोलीस शिपाई संदिप राजपुत, जितेंद्र पाटील, हरीष परदेशी यांनी केली.