मुंबई, 26 जुलै : राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनाने घेतला आहे. या महामंडळाच्या माध्यमातून केळी पिकाबाबत संशोधन करण्यात येणार आहे. त्यामुळे या महामंडळासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. यावेळी सदस्य संजय सावकारे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवसांपूर्वी जळगावला आले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केळी महामंडळासाठी 100 कोटींची घोषणा केली होती. मात्र, जळगावात केळी महामंडळ स्थापन झाले नसतानाही 100 कोटींची घोषणा कशी केली गेली, असा प्रश्नही त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता. मात्र, यानंतर आता काल मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केळी महामंडळासाठी 50 कोटींची तरतूद करण्याची घोषणा केली.
50 कोटींची ही तरतूद कशासाठी –
या महामंडळाला पुरेसा निधी, भागभांडवल, कर्मचारी वर्ग, कार्यालयासाठी इमारत या सर्व गोष्टी उपलब्ध करुन देण्यासाठी ही 50 कोटींची तरतूद कामी पडणार आहे.