मुंबई, 25 सप्टेंबर : राज्यभरातील तरुण- तरुणींच्या सक्रिय सहभागातून राज्य शासनाचे सर्वसमावेशक युवा धोरण साकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्वसमावेशक युवा धोरण निर्मितीसाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कौशल्य विकास आदी पैलूंचा सर्वस्पर्शी विचार करून युवकांकडून सूचना मागविण्यात याव्यात, असे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.
राज्याचे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी शासनाने गठित केलेल्या समितीची आढावा बैठक मंत्रालयात झाली. युवकांनी शिक्षण, रोजगार किंवा सामाजिक व बौद्धिक उपक्रमांमध्ये सक्रिय राहावे यासाठी युवा धोरणात विशेष तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, आयुक्त शीतल तेली-उगले, पद्मश्री कांती शहा, आमदार सत्यजीत तांबे, प्रविण दटके, आशुतोष काळे, डॉ. बाबासाहेब देशमुख, राजेश पवार, संतोष दानवे, अमित गोरखे, अभिजीत पाटील, रोहित पाटील, मॉर्डन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे तसेच विविध राष्ट्रीय व राज्य युवा पुरस्कार विजेते आणि विविध युवा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
क्रीडा मंत्री ॲड.कोकाटे म्हणाले की, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत हे धोरण पोहोचणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील तरुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी विशेष उपक्रमांचा समावेश करावा. महिला व बालविकास विभाग, सांस्कृतिक कार्य, कौशल्य विकास विभाग आदी विभागांच्या समन्वयातून युवकांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यावर भर देण्यात यावा.
राज्यातील सर्व तरुणांना धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात यावेत. युवकांचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य, मानसिक कल्याण, व्यसनाधीनता निर्मूलन, शिक्षण, रोजगार, उपजीविका, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर गुन्हेगारी प्रतिबंध, डिजिटल तंत्रज्ञान आदी महत्त्वाच्या बाबी युवा धोरणाचा भाग असाव्यात, असे निर्देशही ॲड. कोकाटे यांनी यावेळी दिले.