ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 27 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील अनेक भागात आज संध्याकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे आज रात्री पाचोऱ्यासह जळगाव जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, सर्व नदी-नाले लगतच्या परिसरात राहणाऱ्या तसेच इतर नागरिकांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशानाकडून करण्यात आले आहे.
प्रशासनाचे नागरिकांना महत्वाचे आवाहन –
जनावरांना नदी नाल्याच्या काठालगत बांधू नये. ज्या घरांमध्ये पाणी जाण्याची शक्यता असेल, त्या घरातील नागरिकांना शाळा किंवा इतर सुरक्षित ठिकाणी तातडीने शिफ्ट करावे. काहीही मदत हवी असेल तर तातडीने ग्राम प्रशासन आणि तालुका प्रशासन यांच्या निदर्शनास बाबी आणून द्याव्या, असे आवाहन पाचोऱ्याचे तहसीलदार विजय बनसोडे यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्याला हवामान विभागाने दिला ‘रेड अलर्ट’ –
जळगाव जिल्ह्यात मागील आठवड्यात पाचोरा, भडगाव, जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव आणि एरंडोल या तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यासोबत शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशातच आज दुपार पासून जळगाव जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून आज रात्रीपासून उद्यापर्यंत जळगाव जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात नुकसान किती? –
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत पुराच्या परिस्थितीमुळे 5 व्यक्तींचा मृत्यू झालाय. यामध्ये पाचोऱ्यातील तीन, भुसावळ आणि मुक्ताईनगरात एकाचा समावेश आहे. तसेच 1 हजार 922 पशुधन मृत्यूमुखी पडलंय. यासोबतच 1 हजार 68 घरांची पडझड झाली असून 687 घरांत पुराचे पाणी शिरलंय. अतिवृष्टीमुळे 518 गावे बाधित झाले असून 1 लाख 521 शेतकरी बाधित झाले आहेत.