नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सोमवारी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. यानुसार आता, बिहार विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. यामध्ये मतदान 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी होईल, तर मतमोजणी 14 नोव्हेंबर रोजी होईल. तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही 16 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. मतमोजणीच्या शेवटच्या दोन टप्प्यांपूर्वी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण करणे अनिवार्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
बिहारमध्ये एकूण 243 मतदारसंघ आहेत, त्यापैकी दोन अनुसूचित जमातींसाठी आणि 38 अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. तर सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 22 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार, बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार हे पुढच्या महिन्यात 14 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.
बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात मध्य बिहारमधील 121 जागांसाठी मतदान होईल. या भागात पूरग्रस्त आणि ग्रामीण भागांचाही समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात १२२ सीमावर्ती विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या मते, यावेळी राज्यात एकूण 74.3 दशलक्ष मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये सुमारे 14 लाख नवीन मतदारांचा समावेश आहे जे पहिल्यांदाच मतदान करतील.
2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
2020 मध्ये बिहार विधानसभेची निवडणूक ही 3 टप्प्यात झाली होती. या निवडणुकीत एनडीए आघाडीने बहुमत मिळवले. जेडीयू, भाजप, एचएएम आणि व्हीआयपी यांच्या या आघाडीने 243 पैकी 125 जागा जिंकल्या. यामध्ये 74 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. जेडीयूने 43 जागा जिंकल्या, तर एचएएम आणि व्हीआयपीने प्रत्येकी चार जागा जिंकल्या होत्या. तर दुसरीकडे राजदच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने 110 जागा जिंकल्या. त्यापैकी राजदने 75, काँग्रेसने 19 आणि डाव्या पक्षांनी 16 जागा जिंकल्या. या निकालासह, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने पुन्हा एकदा राज्यात सत्ता कायम ठेवली.
यावेळी बिहार विधानसभा निवडणुकीत बहुकोनी लढत होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूच्या नेतृत्वाखालील आणि भाजप आणि इतर मित्रपक्षांच्या पाठिंब्याने सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सत्ता टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे हिंदुस्थानी अवाम मोर्चा (एचएएम), विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी) आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यासारखे छोटे मित्रपक्ष त्यांच्या प्रभावाच्या क्षेत्रात निकालांवर प्रभाव टाकू शकतात.
दरम्यान, विरोधी पक्ष राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश असलेल्या महाआघाडीच्या रूपात निवडणूक लढवत आहेत. महाआघाडी युवक रोजगार, सामाजिक कल्याण आणि जाती समावेश यासारख्या मुद्द्यांवर आपले निवडणूक प्रयत्न केंद्रित करत आहे.