पणजी, 10 ऑक्टोबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते दोना पावला येथे राष्ट्रीय नारळ परिषदचे(National Coconut Conclave) उद्घाटन करण्यात आले. भारतातील नारळ क्षेत्राला बळकटी देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. ही परिषद गोमंतक आणि गोवा शासनाच्या कृषी विभागाने संयुक्तरीत्या आयोजित केली होती. देशभरातील कृषी तज्ञ, धोरणनिर्माते आणि नारळ उत्पादक या परिषदेत सहभागी झाले होते.
या परिषदेत नारळ उत्पादनातील घट, जुनी झाडे पुन्हा उत्पादकयुक्त बनविण्याच्या उपाययोजना, शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब, मूल्यवर्धित प्रक्रिया आणि बाजार विस्ताराच्या संधींवर सविस्तर चर्चा झाली. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि किनारपट्टीवरील राज्यांमधील नारळ उद्योगाचा दीर्घकालीन विकास साधणे हा मुख्य उद्देश होता.
गोव्याची संस्कृती आणि पर्यटनही फुलेल –
सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “गोव्यासारख्या राज्यात राष्ट्रीय स्तरावरील परिषद आयोजित होणे हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. नारळ, मत्स्य आणि पर्यटन हे आपल्या संस्कृतीचे आणि अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत. गोवा शासन नारळ उत्पादक शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य देण्यासाठी आणि नवीन लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे. माड जगला, तर गोव्याची संस्कृती आणि पर्यटनही फुलेल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किसान क्रेडिट कार्ड आणि सॉईल हेल्थ कार्ड या योजना कृषी क्षेत्राला बळकटी देत असून आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाला साथ देतात.”
या कार्यक्रमाला गोव्याचे कृषी मंत्री रवी नाईक, तामिळनाडूचे कृषी मंत्री एम. आर. के. पन्नीरसेल्वम, ICAR-CCARI चे संचालक डॉ. परवीन कुमार, गोमंतकचे संपादक राजू नाईक तसेच सकाळ मिडियाचे प्रतिनिधी उदय जाधव उपस्थित होते. याशिवाय विविध किनारपट्टी राज्यांतील अनेक अधिकारी, वैज्ञानिक आणि शेतकरी देखील सहभागी झाले होते.
हेही वाचा : दिवाळीआधी लाडकी बहिण योजनेचा हप्ता; लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात