मुंबई, 14 ऑक्टोबर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जळगाव जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत तसेच शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरूण पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
दीपकसिंग राजपूत-अरूण पाटील यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश –
मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीपकसिंग राजपूत तसेच अरूण पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील, माजी राज्यसभा खासदार संजय निरूपम, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाकरे गटाला मोठा धक्का –
राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागली असून राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. एकीकडे नगर परिषद, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर झालंय तर दुसरीकडे इच्छुकांकडून उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. अशातच पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असताना दीपकसिंग राजपूत तसेच अरूण पाटील यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
ठाकरे गटातून दोघांची झाली होती ‘हकालपट्टी’–
पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील दीपकसिंग राजपूत आणि अरूण पाटील यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. याबाबतची माहिती मुंबईतील शिवसेना (ठाकरे गट) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली होती. अशातच त्या दोघांचा आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश पार पडलाय.