मुंबई, 24 ऑक्टोबर : दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे या सणाचे वर्णन केले जात असले तरी आजही समाजातील लाखो लोक या सण, उत्सवापासून वंचित आहेत. आपण दिवाळीचा आनंद आपल्या कुटुंब व मित्रपरिवारासह साजरा करतो पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठी दिवाळी म्हणजे केवळ सण नसून माणसांमधील नाळ अधिक घट्ट करणारा उत्सव आहे. दिवाळीचे तीन दिवस हर्षवर्धन सपकाळ यांनी सातपुडा पर्वतरांगांतील भिंगारा, चालीस टपरी, गोमाल या गावांतील गावकऱ्यांसोबत साजरे केले. दरवर्षी या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचे त्यांचे हे मागील २६ वर्षांपासूनचे व्रत आहे..
आदिवासींसोबत दिवाळी साजरी करण्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “हा गोमाळ परिसर माझ्यासाठी केवळ एक भूभाग नाही; माझे येथे सखोल ऋणानुबंध आहेत. येथील लोक माझे केवळ आप्तजन नाहीत, तर ते माझे स्वकीय, माझे कुटुंब आहेत. या सर्वांशी माझे अतूट आणि दृढ नाते जोडले गेले आहे. गेल्या २६ वर्षांपासून मी एक व्रत जपले आहे. माझ्या क्षमतेनुसार, माझ्या कुवतीनुसार माझ्याजवळ असलेला प्रकाश घेऊन, जिथे अंधार आहे तिथे पोहोचण्याचे. दिवाळी म्हणजे प्रकाशाची आराधना, आणि माझा हाच प्रयत्न असतो की माझी संपूर्ण शक्ती पणाला लावून हा प्रकाश येथे आणावा, अंधाराचे रूपांतर प्रकाशात करावे. ही परंपरा अखंड ठेवत, यावर्षी मी सलग २७ वे वर्ष येथील आदिवासी बांधवांच्या वस्त्यांमध्ये आणि गावांमध्ये दिवाळी साजरी करत आहे. आमची ही पद्धत केवळ सणापुरती मर्यादित नसून, मिष्टान्न वाटपाबरोबरच सामुदायिक भोजन, ग्रामसभा आयोजन, वैद्यकीय शिबिरे आणि वस्त्रवाटप हे या उत्सवाचे अविभाज्य घटक आहेत.हे कोणतेही बाहेरून येऊन केलेले औपचारिक सोहळे नाहीत. जसे आपण आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतो, तसेच हे माझे कुटुंब आहे आणि आम्ही सर्व मिळून हा प्रकाशाचा सण एकत्रितपणे साजरा करतो”, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..
सातपुडा पर्वतरांग ही मध्य भारतातील एक विस्तृत आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशी पर्वतरांग आहे. या पर्वतरांगांमध्ये अनेक आदिवासी जमातींचे पारंपरिकरीत्या वास्तव्य आहे. या समाजांचे निसर्गाशी अतूट नाते आहे. ते पर्वत, वने, झरे, शेती व निसर्गाला जिवंत देवता मानून त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करतात. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचेही या आदिवासी बांधवांशी अतूट नाते निर्माण झाले आहे. प्रत्येक दिवाळीला हे नाते अधिक घट्ट होत आहे. येथे जाण्यास रस्ताही नसल्याने गावात पोहोचणे मोठे दिव्य ठरले मात्र आदिवासी बांधवांसाठी दिवाळीनिमित्त नवीन कपडे, जीवनावश्यक साहित्य आणि औषधे घेऊन जाण्यासाठी मोठा प्रयत्न करावा लागला. पाऊस पडल्यामुळे ट्रॅक्टर फसले तरी स्वयंसेवकांच्या अथक प्रयत्नांनी आदिवासींसोबतची दिवाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली.
								
								
																
															 
			 
					





