ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 30 ऑक्टोबर : पाचोरा तालुक्यातील गाळण येथील पै. हितेश अनिल पाटील मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडिया आयोजित स्पर्धेत अजिंक्यपद मिळवलंय. यानंतर तो आता थेट उजबेकिस्तामध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. पै. हितेश पाटील हा पाचोरा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. ललिता अनिल पाटील तसेच पाचोरा शेतकरी सहकारी संघाचे संचालक तथा गाळणचे (खु.) माजी सरपंच अनिल धना पाटील यांचा मुलगा आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत कर्नाटकात मिळवलं सुवर्ण पदक –
कर्नाटकातील बेळगाव येथे मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडिया ही स्पर्धा नुकतीच पार पडली. या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत (National Wrestling Championship) मूळचा गाळणचा रहिवासी असलेला पै. हितेश अनिल पाटील याने खुल्या 125 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले.
उजबेकिस्तामध्ये भारताचे करणार प्रतिनिधित्व –
पै. हितेश पाटीलने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यानंतर तो आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होणार आहे. नोव्हेंबर-2025 मध्ये उजबेकिस्थान ह्या देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत (International Wrestling Championship) मध्ये तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
‘आंतरराष्ट्रीय स्तरावर विजयी झाल्यानंतर पाचोऱ्यात परतणार!’ –
पै. हितेश पाटील सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना म्हणाला की, मागील वर्षी माझ्या खांद्याची शस्त्रक्रिया पार पडली. यानंतर कुस्तीच्या मैदानावर परतलो. ऑपरेशननंतर नियमित सराव, आत्मविश्वास तसेच ईश्वराच्या कृपेने राष्ट्रीय स्तरावर विजय मिळवला. यामुळे उजबेकिस्थानमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. यासाठी पुण्यात नियमितपणे सराव सुरू असून मोठ्या ताकदीने स्पर्धेला सामोरे जाणार आहे.
दरम्यान, कर्नाटकात विजय मिळवल्यानंतर अनेक हितचिंतकांच्या शुभेच्छा प्राप्त होत असून त्या शुभेच्छांचा मी मनापासून स्वीकार करतो आणि आता उजबेकिस्थानमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विजयी झाल्यानंतरच पाचोऱ्यात परतणार, असा विश्वास पै. हितेश पाटीलने व्यक्त केला आहे. यासोबतच पुढील काही महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी देखील सराव सुरू असल्याचे हितेशने सांगितले.
हेही वाचा : तरूणांसाठी महत्वाची बातमी! जळगाव जिल्हा पोलीस दलात 171 जागांसाठी होणार भरती
 
			 
					





