चंद्रकांत दुसाने/ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 2 नोव्हेंबर : पाचोरा-भडगाव मतदारसंघात भाजपने नेहमीच गद्दारी केली असून माझ्या विरोधात निवडणूक लढवलेले आता सर्व एकत्र आले आहेत. मात्र, आता मला तळागाळातील शिवसैनिकांना न्याय द्यायचा आहे. म्हणून मी वरिष्ठांची माफी मागून पाचोरा-भडगाव मतदारसंघात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना ही स्वबळावर लढणार असे ठरविले असून शिवसेनेचीच सत्ता आणून भगवा फडकवायचा आहे, अशी भूमिका आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ठ केली.
वाढदिवसानिमित्त 1 नोव्हेंबर रोजी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. या निर्धार मेळाव्यात आमदार पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वबळाचा नार दिला आहे.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
यावेळी बच्चू कडूंच्या शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनाला आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाठिंबा दिला. तसेच सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करून अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, आगामी काळात शिवसेनेत जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीत एखाद्याला उमेदवारी मिळणार नाही. मात्र, आगामी काळात त्यांना 100 टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण शिवसेनेत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कुणी शिवसैनिकाने गद्दारी केल्यास त्याची गय केली जाणार नाही, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
आगामी निवडणूक प्रतिष्ठेची –
विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उबाठा तसेच राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर टीका केली. मात्र, निवडणुकीत विजय मिळवल्यापासून अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि मी सगळ्यांना सोबत घेतले. कारण मला माझा पक्ष वाढवायचाय, असेही आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले. तसेच आगामी निवडणुक ही प्रतिष्ठेची असल्याचेही ते म्हणाले. या निर्धार मेळाव्यात अनेक राष्ट्रवादी तसेच शिवसेना (ठाकरे गट) यामधील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
यांची होती उपस्थिती –
याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, विष्णू भंगाळे तसेच माजी नगराध्यक्षा सुनिताताई पाटील, संजय गोहील, सरित माळी, डॉ. प्रियंका पाटील तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, शिवसनेचे दीपकसिंग राजपूत, शरद पाटे, पदमसिंग पाटील, किशोर बारावकर किरण पाटील, सुमित पाटील, विनोद तावडे, राहुल पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदारसंघाला डीपीसीमधून अधिकचा निधी द्यावा –
मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघात मोठं नुकसान झाले असून विकासाच्या दृष्टीने हा मतदारसंघ मागे गेलाय. यामुळे जिल्हा नियोजन समितीतून (डीपीसी) विशेष बाब म्हणून अधिकचा निधी मतदारसंघाला द्यावा, अशी विनंती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केली. या निर्धार मेळाव्याचे सूत्रसंचालन वैशाली पाटील, शिवशक्ती-भीमशक्तीचे प्रविण ब्राम्हणे यांनी केले. तर आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांनी मानले.
“…तर जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष असेल!” –
जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघापैकी पाच आमदार भाजपचे तसेच पाच आमदार शिवसेनेचे आहेत आणि एक आमदार अजित दादांच्या राष्ट्रवादीचे आहेत. शिवसेनेचे पाच आमदार हे ग्रामीण मतदारसंघाचे आहेत. आणि भाजपचे चार आमदार ग्रामीणचे आहेत आणि एक आमदार जळगाव शहराचे आहेत. दरम्यान, आमच्या शिंदेसेनेच्या पाचही आमदारांनी ठरवलं ना तर जळगाव जिल्हा परिषदेवर 100 टक्के शिवसेनेचा अध्यक्ष असेल, असेही आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले.
View this post on Instagram
पाचोरा नगराध्यपदाचा उमेदवार वरिष्ठ नेते जाहीर करणार –
पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या नगराध्यपदाच्या उमेदवारीसाठी माजी नगराध्यक्षा सुनिताताई पाटील तसेच डॉ. प्रियंका पाटील यांची नावे चर्चत होती. मात्र, मी या पदाला पुर्णपणे न्याय देऊ शकत नाही, असे डॉ. प्रियंका पाटील यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले. यानंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा नगराध्यपदासाठी सुनिताताई पाटील याच एकमेव उमेदवार असल्याचे सांगत त्यांची उमेदवारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी जाहीर करावी, अशी विनंती केली. यामुळे आगामी काही दिवसांत पाचोरा नगराध्यपदाच्या उमेदवार सुनिताताई पाटील असतील यावर शिक्कामोर्तब झालंय.
पाचोरा शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केलंय –
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या आघाडीवर पाचोरा नगरपालिकेमध्ये शिवसेनेची निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी मी नगराध्यपदाचा उमेदवार होता. त्यावेळी ती निवडणूक लढवत असताना माझ्या वाढदिवसानिमित्त काही गिफ्ट द्यायचे असेल तर माझ्या ताब्यात पाचोरा नगरपालिका द्या, असे आवाहन मी पाचोरा शहरातील नागरिकांना केले होते आणि त्यावेळेस पाचोरा शहरातील जनतेने 24 पैकी 21 नगरसेवक निवडून दिले. त्यादिवसापासून पाचोरा शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केलंय.
दरम्यान, पाचोरा-भडगाव तालुक्याच्या विकासासाठी तसेच माझ्या शिवसैनिकांसाठी आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेला मताधिक्य देऊन मला वाढदिवसाचं गिफ्ट द्यावं, असे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले.






