जळगाव, 3 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातील शिवराम नगर येथील निवासस्थानी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. दरम्यान, या चोरीप्रकरणात आता पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून चोरलेले मौल्यवान दागिने त्यांच्याकडून जप्त केले आहेत. दोघांकडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह एकूण 6 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यावर चोरी झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरूवात केली होती. जळगाव येथे घरफोडी केल्यानंतर आरोपींनी उल्हासनगर येथे चिराग सय्यद या व्यक्तीकडे मुद्देमाल सोपवला होता. तसेच चिराग सय्यद याने हा मुद्देमाल कैलास खंडेलवाल नामक सराफ व्यवसायाकडे दिला होता, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली. यानंतर चिराग सय्यद तसेच कैलास खंडेलवाल या दोघांनाही पोलिसांनी अटक केलीय.
मुख्य आरोपींचा शोध सुरू –
एकनाथ खडसेंच्या बंगल्यावरी चोरी प्रकरणातील एजाज अहमद, मोहम्मद बिलाल, बाबा अशी या मुख्य आरोपींची नावे आहेत. मात्र, प्रत्यक्ष घरफोडी करणाऱ्या हे तीन आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसून हे तिघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलीय.
चोरांकडे सीडी व पेन ड्राईव्ह सापडले नाही –
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानातील चोरी प्रकरणात तपासादरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खडसे यांनी सुरुवातीला त्यांच्या घरातून कागदपत्रे, सीडी आणि पेन ड्राइव्ह चोरीला गेल्याचा दावा केला होता. मात्र, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये अशी कोणतीही कागदपत्रे, सीडी किंवा पेन ड्राइव्ह आढळलेली नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. यामुळे आता एकनाथ खडसे यावर काय बोलतात हे देखील महत्वाचे ठरणार आहे.
यांनी केली कारवाई –
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, रामानंद नगर पोस्टे यांचे मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोस्टेचे पोउपनि सचिन रणेशवरे, पोह/ सुशिल चौधरी, सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपुत विनोद सुर्यवंशी, पोना/ हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, योगेश बारी, मनोज सुरवाडे, अतुल चौधरी, पोशि/गोविंदा पाटील, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि / शरद बागल, शेखर डोमाळे, पोह/अक्रम शेख, विजय पाटील, प्रविण भालेराव, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, किशोर पाटील, मुरलीधर धनगर, पोशि/रविंद्र कापडणे, राहुल रगडे, दिपक चौधरी, बबन पाटील प्रदीप चौरे, महेश सोमवंशी, कुंदनसिंग बयास आदींचे पथकाने कामकाज करुन गुन्हा गुन्हयातील आरोपी अटक करुन मुददेमाल हस्तगत केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि/राजेंद्र गुंजाळ यांचे मार्गदर्शनात रामनंद नगर पोलिस स्टेशनचे पोउपनि सचिन रणेशवरे हे करीत आहेत.






