जळगाव, 4 ऑक्टोबर : जळगाव जिल्हा पोलीस दलातील श्वान पथकातील अत्यंत कुशल आणि शूर श्वान ‘जंजीर’ याची आज सन्मानपूर्वक निवृत्ती करण्यात आली. जंजीरच्या निवृत्ती समारंभाला जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, श्वान पथक प्रभारी अधिकारी पो. उपनिरीक्षक देविदास वाघ, तसेच पोहेकॉ निलेश झोपे, पोना प्रशांत कंकरे आणि पोहेकॉ संदीप परदेशी उपस्थित होते.
‘जंजीर’चा जन्म 18 नोव्हेंबर 2017 रोजी झाला होता. गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे त्याने नऊ महिन्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर 7 एप्रिल 2018 रोजी जळगाव जिल्हा पोलीस दलात त्याची नेमणूक झाली.
सेवेच्या काळात जंजीरने चाळीसगाव, MIDC आणि भुसावळ शहर पोलिस ठाण्यासह विविध ठिकाणी कार्यरत राहून अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आरोपींचा माग काढणे, पुरावे शोधून काढणे आणि तपासाला योग्य दिशा देण्यात जंजीरने पोलीस दलाला मोलाची साथ दिली.
हेही वाचा : मोठी बातमी! नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकांची घोषणा; ‘असा’ असेल निवडणुकीचा कार्यक्रम






