जळगाव, 10 नोव्हेंबर : राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगर पंचायतीसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. त्यानुसार, आज 10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासनाची देखील तयारी पुर्ण झाली आहे. तर दुसरीकडे नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्यभरात सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झालीय.
जळगाव जिल्ह्यात 18 ठिकाणी निवडणूक होणार –
राज्य निवडणूक आयोगामार्फत जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, जिल्हा प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील एकूण 19 नगरपरिषदांपैकी बोदवड येथे आधीच नगरपरिषद अस्तित्वात असल्यामुळे उर्वरित 18 ठिकाणी निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीत भुसावळ ही ‘अ’ वर्ग नगरपरिषद, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जामनेर आणि पाचोरा या ‘ब’ वर्ग नगरपरिषद, तर यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा, भडगाव,धरणगाव, सावदा, रावेर, एरंडोल आणि फैजपूर, या ‘क’ वर्ग नगरपरिषद आहेत. शेंदूर्णी आणि मुक्ताईनगर या दोन नगरपंचायती आहेत.
जिल्ह्यात 977 मतदान केंद्र तयार –
एकूण 464 सदस्य पदांसाठी निवडणूक होणार असून, एकूण प्रभागांची संख्या 246 आहे. जिल्ह्यातील मतदारसंख्या 8,89,914 इतकी असून, त्यात पुरुष 4,50,893, महिला 4,38,938 आणि इतर 83 मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात 977 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक Assured Minimum Facilities (रॅम्प, पिण्याचे पाणी, स्वच्छता, विज, प्रकाशव्यवस्था आदी) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी किरकोळ दुरुस्तीची कामे सुरू आहेत.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
- नामनिर्देशन पत्र दाखल: 10 ते 17 नोव्हेंबर, सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत
- नामनिर्देशन पत्रांची छाननी: 18 नोव्हेंबर
- नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख: 21 नोव्हेंबर (अपील नसेल तिथे )
- निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी: 26 नोव्हेंबर
- मतदान: 2 डिसेंबर
- मतमोजणी व निकाल: 3 डिसेंबर
कुठलीही तक्रार असल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा –
प्रचारासाठी आचारसंहितेनुसार 30 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत प्रचार थांबवावा लागेल. मात्र सभा व मोर्चांसाठी परवानगी रात्री 10 वाजेपर्यंतच वैध राहील. प्रत्येक ठिकाणी एकल खिडकी योजना (Single Window System) सुरू करण्यात आली आहे, ज्यामधून बॅनर, पोस्टर, मोर्चा, सभा यांसाठीच्या परवानग्या स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभाग यांच्या समन्वयाने दिल्या जातील.
जळगाव जिल्ह्यातील सर्व आर.ओ., ए.आर.ओ., तसेच पोलीस विभाग, महसूल विभाग आणि इतर 78 विभाग यांची समन्वय बैठक घेऊन संपूर्ण निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान एफएसटी, एसएसटी, व्हिजिलन्स, एमसीएमसी अशा सर्व समित्या गठित करण्यात आल्या आहेत.
एकूण 977 मतदान केंद्रांसाठी सुमारे 5 मनुष्यबळ प्रति केंद्र अशा प्रमाणात कर्मचारी नेमले जाणार आहेत, तसेच 20% अतिरिक्त राखीव मनुष्यबळ ठेवले आहे. ईव्हीएम ची प्राथमिक चाचणी पूर्ण झाली असून, ईव्हीएम मॅनेजमेंट सिस्टम (EMS) सॉफ्टवेअरद्वारे बारकोड स्कॅनिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व मतदारांना आवाहन केले आहे की, ही निवडणूक पारदर्शक आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे आणि कुठलीही तक्रार असल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा.






