जळगाव, 10 नोव्हेंबर : जळगाव शहरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली असून, जुन्या वैरातून झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कांचन नगर परिसरात घडली. मृत तरुणाचे नाव आकाश युवराज बाविस्कर (उर्फ टपऱ्या) असे असून, गोळीबार करणारा आकाश सपकाळे (उर्फ डोया) हा घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेसह शनिपेठ पोलिसांनी आकाश सपकाळेचा तात्काळ शोध घेत अटक केली.
नेमकी बातमी काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, हद्दपार आकाश सपकाळे आणि सागर सपकाळे यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होता. रविवारी संध्याकाळपासूनच या दोघांमध्ये तणाव वाढला होता. रात्री उशिरा आकाश सपकाळे हा सागर सपकाळे यांच्या घरासमोर आला आणि गोळीबार केला.
गोळीबारात तरूणाचा मृत्यू –
या गोळीबारात आकाश युवराज बाविस्कर (29), सागर सुधाकर सपकाळे (24), गणेश रविंद्र सोनवणे (28), आणि तुषार रामचंद्र सोनवणे (30) असे तीन जण जखमी झाले. सर्वांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान आकाश बाविस्कर याचा मृत्यू झाला.
गोळीबार करणाऱ्यास पोलिसांनी केली अटक –
स्थानिक गुन्हे शाखेसह शनिपेठ पोलिसांनी गोळीबारानंतर फरार संशयितांचा शोध सुरू केला. रात्री उशिरा आकाश उर्फ डोया याला ताब्यात घेऊन शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी नितीन गनापुरे, तसेच शनिपेठ पोलिस ठाण्याच्या निरीक्षक कावेरी कमलापूरकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पुढील तपास सुरू केलाय.






