मुंबई : राज्यातील 246 नगरपरिषद व 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या नामनिर्देशन प्रक्रियेत ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांना आपली कागदपत्रे दाखल करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने तातडीने हस्तक्षेप करत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, उमेदवारांचे ऑनलाइनसोबतच ऑफलाइन पद्धतीनेही नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे आदेश जारी केले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाचा तातडीचा मोठा निर्णय –
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आला. कार्यक्रमानुसार नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी, ऑनलाइन प्रणालीत सतत येणाऱ्या तांत्रिक त्रुटींमुळे अनेक उमेदवार आपले नामनिर्देशन सादर करू शकले नव्हते. नामनिर्देशनासाठी फक्त दोन दिवस उरले असताना ही समस्या गंभीर बनली होती. समान संधी न मिळाल्यास निवडणूक प्रक्रियेवरच परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
ऑनलाईन सोबतच ऑफलाईनची सुविधा –
दरम्यान, ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्राद्वारे उमेदवारांसाठी मोठा दिलासा दिला आहे. आयोगाने कळविल्यानुसार, 15 नोव्हेंबर 2025 ते 17 नोव्हेंबर 2025 या तीन दिवसांत, सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, उमेदवार आपले नामनिर्देशनपत्र ऑनलाइन (संगणक प्रणालीद्वारे) तसेच ऑफलाइन (प्रत्यक्ष सादर करून) या दोन्ही पद्धतीने सादर करू शकतील.
16 नोव्हेंबर, रविवार रोजी देखील अर्ज दाखल करता येणार –
विशेष म्हणजे, 16 नोव्हेंबर हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असूनही नामनिर्देशन स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. नामनिर्देशनाची सत्यता व स्वीकृती यासंदर्भातील अंतिम निर्णय संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी घेणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय तातडीने सर्व संबंधित अधिकारी व उमेदवारांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. याबाबतचे पत्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, सचिव सुरेश काकाणी यांनी जारी केले आहे.
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केली होती मागणी –
पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना अडचणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच इच्छुक उमेदवारांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात यावे अथवा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन-तीन दिवस मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
दरम्यान, ऑनलाइन अर्ज करताना येत असल्याच्या अडचणींबाबत राज्य निवडणूक आयोगाने तात्काळा मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे इच्छुक उमेदवारांच्या अडचणी मोठ्या प्रमाणावर दूर होणार आहेत. सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेला हा तातडीचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मागणीला देखील यश आल्याचे दिसून येत आहे.






