श्रीनगर, 15 नोव्हेंबर : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशनच्या परिसरात झालेल्या भीषण स्फोटात किमान 9 जणांचा मृत्यू झाला असून 29 हून अधिक जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री हा स्फोट झाला आणि या स्फोटाच्या तीव्रतेमुळे परिसरातील इमारतींना मोठे नुकसान झालंय तसेच काही भागांना आग लागल्याची देखील माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्षदर्शी तसेच सीसीटीव्ही फुटेजनुसार, स्फोटानंतर परिसर धुराने आणि ज्वाळांनी वेढला गेला. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून श्रीनगरचे उपायुक्त अक्षय लाब्रू यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेतली. दरम्यान, या स्फोटाच्या घटनेबाबत अधिकृत तपशील मात्र अद्याप समोर आलेले नाहीये.
प्राथमिक तपासात सांगण्यात येत आहे की, पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त केलेले अमोनियम नायट्रेट साठवून ठेवण्यात आले होते. फॉरेन्सिक पथक या साहित्याची तपासणी करत असताना स्फोट झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अलीकडेच दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार स्फोटाच्या पार्श्वभूमीवर अटक केलेल्या संशयितांची नौगाम पोलीस ठाण्यात चौकशी सुरू होती,
याचदरम्यान हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी स्फोटामागील नेमके कारण आणि घडामोडींचा क्रम अद्याप स्पष्ट झालेला नाहीये. याबाबत अधिकृत अहवाल आल्यानंतरच या घटनेचे खरे स्वरूप समोर येणार आहे.






