जामनेर, 20 नोव्हेंबर : राज्यात नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जामनेरमधून मोठी बातमी समोर आली आहे. जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधनाताई महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या तिन्ही विरोधी उमेदवारांनी एकाच वेळी माघार घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल जामनेर तसेच जळगावात जल्लोष साजरा करण्यात आला.
साधनाताई महाजन यांची बिनविरोध निवड –
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. जामनेर नगरपरिषद निवडणुकीत पूर्वी नगराध्यक्षा राहिल्याने साधना महाजन यांच्या प्रशासनातील अनुभवाचा विचार करून भाजपने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवत नगराध्यक्षपदाची उमेदवारी घोषित केली.
तिन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतले मागे –
नगराध्यपदासाठी साधनाताई महाजन यांच्याविरोधात काँग्रेसकडून रूपाली पारस ललवाणी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातर्फे प्रतिभा संतोष झाल्टे आणि अजित पवार गटाच्या सरीता ज्ञानेश्वर बोरसे यांनी अर्ज दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर ही लढत जोरदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी वैयक्तिक पातळीवर सक्रिय होत बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न केल्याच्या चर्चा समोर येत होत्या.
दरम्यान, या चर्चांना यश मिळाल्याने गुरुवारी तिन्ही विरोधी उमेदवारांनी एकाच वेळी माघार घेतली आणि बिनविरोध निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला. आज गुरूवार 20 नोव्हेंबर रोजी दुपारी एकाच वेळी तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतली आणि साधनाताई महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर जामनेर तसेच जळगाव शहरात भाजपकडून विजयाचा गुलाल उधळत जल्लोष करण्यात आला.






