मुंबई, 23 नोव्हेंबर : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येची घटना अत्यंत गंभीर, संतापजनक व मानवतेला काळिमा फासणारी आहे. या घटनेमुळे पीडित कुटुंबाची झालेली मानसिक, सामाजिक व भावनिक हानी अपरिमित असून, शासनामार्फत पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून 10 लाख रुपयांची तत्काळ मदत मंजूर करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
संबंधित घटनेची माहिती मिळताच प्रशासनाला कुटुंबाच्या मदतीसाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री तटकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार, या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला होता. जिल्हा महिला व बालविकास समितीने मनोधैर्य योजनेअंतर्गत 10 लाख रुपये इतकी आर्थिक मदत पिडीत बालिकेच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला.
मंजूर मदत ही केवळ तत्काळ दिलासा देणारी असून वास्तविक झालेली हानी कोणत्याही आर्थिक सहाय्याने भरून न येणारी आहे. तथापि, या कठीण प्रसंगी शासन त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहे, असे मंत्री तटकरे यांनी नमूद केले.
यापुढील काळात या प्रकरणाच्या तपास प्रक्रियेत आवश्यक समन्वय, कायदेविषयक मार्गदर्शन, पुनर्वसनासंदर्भातील सहाय्य, तसेच पीडित कुटुंबाच्या रक्षण आणि हिताविषयीच्या सर्व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महिला व बालविकास विभाग पूर्णतः कटिबद्ध असून, संबंधित यंत्रणांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : विशेष मालिका: किस्से राजभवनाचे – लेख नववा | नागपूर राजभवनाचा ‘असा’ आहे इतिहास






