जळगाव, 4 ऑगस्ट : रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्यावतीने अमृत भारत स्थानक योजना राबवली जात आहे. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत भुसावळ रेल्वे विभागातील 15 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. या कामांचे येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील पाचोरा, रावेर, सावदा, चाळीसगाव या स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.
काय होणार सुविधा –
या योजनेअंतर्गत निवडलेल्या स्थानकांसाठी भविष्यात बांधल्या जाणाऱ्या रूफ प्लाजा, एक्झिक्युटिव्ह लॉज, स्टेशनचे अप्रोचेस, लँडस्केपिंग, मॉडेल टॉयलेट, प्लॅटफॉर्म सरफेस, केबल ट्रेज, अत्याधुनिक फर्निचर भरपूर प्रकाश योजनेसाठी एलईडी, बोर्ड, पार्किंग व्यवस्था, प्रतिक्षालय, याशिवाय प्लॅटफॉर्मची लांबी दिव्यांगासाठी सोयीसुविधा आदींचा समावेश करण्यात आला आहे.
या रेल्वे स्थानकांचा समावेश –
भुसावळ विभागातील पाचोरा, चाळीसगाव, धुळे, नेपानगर, रावेर, सावदा, मनमाड, देवळाली, नांदगाव, लासलगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, शेगाव, नांदूरा, मलकापूर या स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.
अमृत भारत स्थानक योजना –
अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत देशभरातील तब्बल 1 हजार 309 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यात भुसावळ विभागातील 15 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यामुळे या रेल्वे स्थानकांचा कायपालट होणार आहे. योजनेअंतर्गत अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
सूचना करण्याचे आवाहन –
रेल्वे स्थानकावर हव्या असलेल्या सोयीसुविधांबाबत सूचना मागविण्यात आल्या आहेत. भुसावळ विभागाचे अमृत भारत स्टेशन नावाचे ट्विटर अकाउंट आहे. भुसावळ विभागाचे अमृत भारत स्टेशन नावाचे ट्विटर खाते आहे तसेच भुसावळ रेल्वे विभागाच्या मेलवरही सूचना करण्याचे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.