मुंबई, 6 डिसेंबर : महाराष्ट्राचे राज्यपालांचे निवासस्थान राजभवन मुंबई येथे आहे. या राजभवनाशी संबंधित महत्त्वाचे किस्से, महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या वतीने ‘राजभवनाचे किस्से’ ही विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून राजभवनातील माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याद्वारे लिखित एक विशेष लेख दर आठवड्याला प्रकाशित केला जातो. दरम्यान, आता या राजभवनाचे नाव बदलून लोकभवन करण्यात आले आहे. त्यामुळे आता आमच्या किस्से राजभवनाचे या मालिकेचे नावही आम्ही किस्से लोकभवनाचे असे करत आहोत.
केंद्र शासनाच्या सूचनेला अनुसरून महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्र राजभवनाचे नाव लोकभवन करण्याचे निर्देश दिले. राजभवनाच्या संकेतस्थळावर महाराष्ट्र लोक भवन असे नामांतर करण्यात आले आहे. लवकरच सर्वत्र हे बदल दिसतील.
राज्यपाल कोश्यारी यांनी केले होते लोकभवनाचे सूतोवाच
दिनांक १४ जून २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मलबार हिल येथील राजभवन येथील ब्रिटिश कालीन बंकर मध्ये तयार करण्यात आलेल्या ‘क्रांती गाथा’ या क्रांतिकारकांच्या दालनाचे उदघाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधानांसमोरच राजभवनाचे ‘लोक भवन’ व्हावे असा प्रयत्न असल्याचे सांगितले होते.
“राजभवन येथे अनेक लोक येतात. माझा प्रयत्न आहे की राजभवन हे केवळ राजभवन राहू नये… हे लोक भवन व्हावे, येथे जनसामान्य लोक यावे,” असे उद्गार कोश्यारी यांनी काढले होते.
१४० वर्षांच्या प्रवासात दुसरे नामांतर –
ब्रिटिश राजवटीत सन १८८५ साली गव्हर्नर निवासस्थान परळ येथून मलबार हिल येथे आले, त्यावेळी त्याचे नाव ‘गव्हर्मेंट हाऊस’ ऑफ बॉम्बे असे होते. स्वातंत्र्यानंतर ते ‘राजभवन’ झाले. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर ते महाराष्ट्राचे राजभवन झाले आणि आता महाराष्ट्राचे लोकभवन झाले.
लेखन – श्री. उमेश काशीकर (माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी, लोकभवन, मुंबई)






