मुंबई, 29 डिसेंबर : राज्यात महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडीची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मात्र, मुंबईत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात युती झाली नसल्याचे स्पष्ठ झालंय.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती झाली आहे. तसेच मुंबईत वंचित आघाडी आणि काँग्रेसने युती केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीतील युती-आघाड्यांबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे.
अंजली दमानिया यांनी काय म्हटलंय? –
अंजली दमानिया यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटलंय की, “महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास म्हणता, मग दोन्ही राष्ट्रवादी फक्त पिंपरी–चिंचवडपुरतेच एकत्र का? संपूर्ण महाराष्ट्रात एकत्र येण्याची हिम्मत, इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा नाही का? की विकास, विचारसरणी आणि तत्त्वे सत्तेच्या गणितापुढे गहाण टाकली आहेत? भाजपाला नवाब मलिक असलेला अजित पवार गट विधानसभेत चालतो, पण मुंबईत चालत नाही? काय अजब राजकारण चालू आहे?”






