मुंबई, 4 जानेवारी : राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू येत्या 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आज जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करताना धमकावल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात ठोस कारवाईची मोठी मागणी केली.
नेमकी बातमी काय? –
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करताना धमकावल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. या प्रकरणातील एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत कठोर कारवाईची मागणी केली आहे. राहुल नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच निवडणूक आयोगाने त्यांचे तात्काळ निलंबन करावे, अशी ठाम मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
निवडणूक आयोगाने हा विषय गांभीर्याने घ्यावा –
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मी मुद्दाम राहुल नार्वेकर यांचं नाव घेतोय. कारण, विधानसभा अध्यक्षांचा अधिकार हा फक्त सभागृहात असतो. सभागृहाच्या बाहेर ते एक आमदार असतात. पण एक आमदार आपल्या पदाचा गैरवापर करून लोकांना धमकावत असेल, संरक्षण काढून घेण्याचे आदेश देत असेल आणि स्वतः मात्र सुरक्षेत फिरत असेल, तर हे गंभीर आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा विषय गांभीर्याने घ्यावा आणि विधानसभा अध्यक्षांना तात्काळ निलंबित करावे.
View this post on Instagram
निलंबन करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा –
तसेच विधानसभा अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात. ते विधिमंडळाचे प्रमुख असतात आणि त्यांची जबाबदारी निष्पक्षपणे कारभार करण्याची असते. अध्यक्षांना प्रचार करता येत नाही. मात्र राहुल नार्वेकर यांनी या नियमांना धाब्यावर बसवणारे वर्तन केले आहे. त्यामुळे त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे आणि या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलीय.






