जळगाव, 8 जानेवारी : जळगाव लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने जामनेरात मोठी कारवाई केली आहे. जमिनीच्या फेरफार नोंदी व 7/12 उताऱ्यावर नाव लावण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी जामनेर येथील तलाठ्यास वसीम राजु तडवी (वय २७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. याप्रकरणी राजु तडवी याच्यावर जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जामनेर येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराने 16 डिसेंबर 2025 रोजी जामनेर शिवारातील बिनशेतीचे दोन प्लॉट कायमस्वरूपी खरेदी केले होते. या प्लॉटच्या खरेदीनंतर तक्रारदार व त्यांच्या पत्नीचे नाव अधिकार अभिलेखात तसेच 7/12 उताऱ्यावर नोंदवण्यासाठी तलाठी वसीम तडवी याने 5 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
4 हजार रूपयांची स्वीकारली लाच –
याबाबत तक्रारदाराने 7 जानेवारी 2026 रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता पंचांसमक्ष तलाठी वसीम तडवी याने फेरफार नोंदी करून देण्याच्या मोबदल्यात 5 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर 4 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले.
एसीबीने पकडले रंगेहात –
त्यानुसार सापळा रचण्यात आला असता, काल 7 जानेवारी रोजी तक्रारदाराकडून 4 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी वसीम राजु तडवी याला एसबीने रंगेहात पकडले. याप्रकरणी त्याच्याविरोधात जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ. भुषण पाटील यांनी केली.






