मुंबई, 11 जानेवारी : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात सर्वच राजकीय पक्षांच्या सभा होत आहेत. यातच आज मुंबईत एक इतिहास घडताना दिसणार आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडल्यानंतर मागच्या वर्षी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्यावर एकत्र आले. यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युती झाली. दरम्यान, आज तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची शिवाजी पार्कवर संयुक्त जाहीर सभा होणार आहे.
काय बोलणार याकडे लक्ष –
महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुती आणि शिवसेना-मनसे युतीच्या माध्यमांतून एकमेकांवर टीका केली जात आहे. भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे आज पुन्हा ठाकरे बंधू मराठी मतदारांना आणि मुंबईकरांना नेमकी काय साद घालतात? याकडे विशेष लक्ष असणार आहे. शिवाजी पार्कवर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेच्या माध्यमातून ठाकरे बंधू हे मोठे शक्ती प्रदर्शन करणार आहेत.
तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू हे एकत्र आले असून पहिल्यांदाच आता ते मुंबईतील शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने हा एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे. या जाहीर सभेला लाखो कार्यकर्त्यांची उपस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोषाचे वातावरण आहे.






