मुंबई, 13 जानेवारी : राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत आज महत्वाची घोषणा होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितींच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे समजते.
राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद –
राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर होताच संबंधित 12 जिल्हा परिषदांमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. यामध्ये पुणे, सोलापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. या निवडणुका नेमक्या कोणत्या तारखांना होणार, याबाबतचा सविस्तर कार्यक्रम आजच्या पत्रकार परिषदेत जाहीर केला जाणार आहे.
‘या’ 12 जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका जाहीर होणार –
पुणे, छत्रपती संभाजीनगर, परभणी, सातारा, सांगली, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदांसह त्या अंतर्गत येणाऱ्या एकूण १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा आज करण्यात येणार आहे. या सर्व १२ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत असल्यामुळे येथे निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उर्वरित जिल्हा परिषदेच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात –
50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्य निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळाला आहे. उर्वरित २० जिल्हा परिषद आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जाणार आहेत.
सुप्रिम कोर्टाने निवडणुका घेण्यासाठी अतिरिक्त मुदत देण्यास मान्यता दिली असून, त्यानुसार आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडे निवडणुकांसाठी अधिक वेळ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आता येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे.
Video | : महानगरपालिका निवडणूक 2026 : ठाण्यात उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची जाहीर सभा, जोरदार भाषणं






