मुंबई, 13 जानेवारी : राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत आज अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आल्या आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबत माहिती दिली आहे.
पहिल्या टप्प्यातील निवडणुका जाहीर –
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून 16 जानेवारीला अधिसूचना काढली जाईल. त्यानुसार, इच्छूकांना 15 जानेवारी या तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून त्यासाठीची अंतिम मुदत 21 जानेवारी ही असेल. 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीमुळे ग्रामीण भागात आचारसंहिताही लागू होणार आहे.
‘असा’ असेल निवडणुकीचा कार्यक्रम –
- जिल्हाधिकाऱ्यांद्वारे निवडणुकीसंदर्भात अधिसूचना प्रसिद्धी –16 जानेवारी 2026
- उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात -16 ते 21 जानेवारी 2026
- उमेदवारी अर्जाची छानणी – 22 जानेवारी 2026
- उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत – 27 जानेवारी 2026 (दुपारी 3 वाजेपर्यंत)
- अंतिम उमेदवारांची यादी आणि चिन्ह वाटप – 27 जानेवारी 2026 (साडेतीन वाजेनंतर)
- मतदानाचा दिनांक – 5 फेब्रुवारी 2026 (7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत)
- मतमोजणीचा दिनांक – 7 फेब्रुवारी 2026 (सकाळी 10 वाजतापासून सुरूवात)
‘या’ 12 जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका जाहीर होणार –
पुणे, छत्रपती संभाजीनगर, परभणी, सातारा, सांगली, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदांसह त्या अंतर्गत येणाऱ्या एकूण १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा आज करण्यात येणार आहे. या सर्व १२ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत असल्यामुळे येथे निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच पुढील निवडणुकांचा निर्णय –
राज्य निवडणूक आयोगाकडून पहिल्या टप्प्यातील निवडणूका जाहीर झाल्यानंतर उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणूका केव्हा जाहीर होणार, असा सवाल उपस्थित होतोय. याबाबत बोलताना आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. त्याबाबत सुनावणी पार पडल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच उर्वरित २० जिल्हा परिषद आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यात येतील.
हेही वाचा : महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी






