जळगाव, 14 जानेवारी : राज्यभरात सध्या महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा उडालेला असून या निवडणुकीचा अंतिम टप्पा उद्या गाठला जाणार आहे. जळगाव महानगरपालिकेसाठी बुधवार, 15 जानेवारी रोजी सकाळी 7 ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, गुरुवार 16 जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे जळगाव शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.
321 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात –
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत 19 प्रभागांमधून एकूण 75 नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. या जागांसाठी 321 उमेदवार रिंगणात उतरले असून, उमेदवारांनी गेल्या काही आठवड्यांपासून जोरदार प्रचार केला आहे. महायुती, महाविकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांनीही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.
जळगाव शहरात 516 मतदान केंद्र –
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात 516 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. शांततेत व पारदर्शक पद्धतीने मतदान पार पडावे यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
जळगाव शहरात 4 लाखांहून अधिक मतदार –
जळगाव शहरात यंदा एकूण 4 लाख 38 हजार 523 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष, महिला तसेच नवमतदारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. प्रशासनाकडून मतदारांना मतदानासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
16 जानेवारी रोजी मतमोजणी –
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांमध्ये जोरदार लढत रंगली असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवार असा तिहेरी सामना होण्याची शक्यता आहे. दरम्यान, 16 जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून, कोणाच्या पारड्यात सत्ता जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
जळगाव महानगरपालिका निवडणूक 2026 –
- प्रभाग – 19
- सदस्य -75
- उमेदवार – 321
- मतदान केंद्र -516
- एकूण मतदार – 4 लाख 38 हजार 523






