नवी दिल्ली, 15 जानेवारी : केंद्र सरकारने देशाच्या अंतर्गत व सीमावर्ती सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या संस्थांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. दहशतवादविरोधी कारवायांमध्ये अग्रभागी असलेल्या राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए), भारत-तिबेट सीमा पोलिस दल (आयटीबीपी) आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) यांना नवे नेतृत्व मिळालंय.
एनआयएच्या महासंचाकपदी राकेश अग्रवाल यांची नियुक्ती –
दहशतवादविरोधी तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे राकेश अग्रवाल यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश केडरचे १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले अग्रवाल सध्या एनआयएमध्ये विशेष महासंचालक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी, त्यांनी हंगामी महासंचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांच्या नियुक्तीस मंजुरी दिली असून, ते ३१ ऑगस्ट २०२८ रोजी सेवानिवृत्त होईपर्यंत या पदावर राहणार आहेत.
आयटीबीपीच्या महासंचालकपदी शत्रुजीत सिंग कपूर –
भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या (आयटीबीपी) महासंचालकपदी शत्रुजीत सिंग कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हरियाणा केडरचे १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले कपूर सध्या आपल्या मूळ केडरमध्ये कार्यरत आहेत. ते ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आयटीबीपीचे प्रमुख म्हणून कार्यरत राहणार आहेत.
प्रविण कुमार होणार बीएसएफचे महासंचालक –
आयटीबीपीचे विद्यमान महासंचालक प्रवीण कुमार यांची सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल केडरचे १९९३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले कुमार ३० सप्टेंबर २०३० पर्यंत बीएसएफचे नेतृत्व करणार आहेत. दरम्यान, या तीन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे देशाच्या दहशतवादविरोधी आणि सीमासुरक्षा यंत्रणांना अनुभवी व सक्षम नेतृत्व मिळाल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा : Nashik News : कुंभमेळ्यातील विकासकामांची विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून पाहणी






