जळगाव, 12 ऑगस्ट : सामाजिक सलोखा वृध्दींगत होण्यास व विधायक कामांना गती मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिक, गणेश मंडळे, सरपंच , नगरसेवक व सर्व पदाधिकारी यांनी ‘एक गाव, एक वॉर्ड, एक गणपती’ साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
राज्यात दरवर्षीप्रमाणे 19 ते 28 सप्टेंबर २०२३ या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा होणार आहे. ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेस विरोध करणेसाठी जनतेची एकजुट साधण्याकरीता व सामाजिक ऐक्य व सलोखा वृध्दींगत करणेकरीता लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी करणेस सुरूवात केली.
आज स्वातंत्र्याच्या अमृतकालामध्ये सामाजिक ऐक्य व सलोखा राखणे ही देशाची आर्थिक व भौतीक प्रगती साधण्याची पूर्व अट झालेली आहे. वर्तमानात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मुळ उद्देशाचा विसर नागरिकांना पडत चालल्याचे दिसून येत आहे. गल्लोगल्ली स्थापन झालेली गणेश मंडळांच्या माध्यमातून बऱ्याचदा राजकीय व सामाजिक तेढ निर्माण झाल्याच्या घटना घडत असतात.
त्यामुळे सार्वजनिक स्वरूपात साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवात विदयार्थ्यांसाठी स्पर्धा, चर्चासत्र, महिलांसाठीचे उपक्रम, आरोग्य तपासणी, सांस्कृतीक कार्यक्रम इ. रचनात्मक कामांचे आयोजन करावे व उत्सवास बिभित्सपणा आणणारे फ्लेक्स, पोस्टर्स लावण्यास फाटा देण्यात यावा. या उत्सवात उत्कृष्ट काम करणाऱ्या गणेश मंडळांना / ग्रामपंचायतीस / वॉर्डास सन्मानित करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद द्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले आहे.