नवी दिल्ली, 20 जानेवारी : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्यालयात मंगळवार, २० जानेवारी रोजी दुपारी याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. यानंतर नितीन नबीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
नितीन नबीन यांचा राजकीय प्रवास –
नितीन नबीन यांचा जन्म २३ मे १९८० रोजी बिहारमधील पाटणा येथे झाला. त्यांचे वडील किशोर प्रसाद सिन्हा हे भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच बांकीपूरचे माजी आमदार होते. २००६ मध्ये वडिलांच्या निधनानंतर नितीन नबीन यांनी बांकीपूर मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवून आमदारकी पटकावली. त्यानंतर २०१०, २०१५ आणि २०२० या विधानसभा निवडणुकांतही त्यांनी विजय मिळवला. २०२५ च्या निवडणुकीत पाचव्यांदा ते आमदार झाले असून, या निवडणुकीत त्यांना ९८ हजार २९९ मते मिळाली.
२०२५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर नितीन नबीन यांना नितीश कुमार सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. सध्या ते बिहारचे बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी २०२१ ते २०२२ या कालावधीतही त्यांनी याच खात्याची जबाबदारी सांभाळली होती. पक्ष संघटनेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच बिहार प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले आहे.
View this post on Instagram
नितीन गडकरींपासून जे. पी. नड्डांपर्यंतचा प्रवास –
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी यापूर्वी महाराष्ट्रातील नेते नितीन गडकरी यांनी २००९ ते २०१३ या काळात कामकाज पाहिले. त्यानंतर २०१३ ते २०१४ या कालावधीत राजनाथ सिंह यांनी दुसऱ्यांदा ही जबाबदारी सांभाळली. २०१४ ते २०२० या काळात अमित शाह हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, तर २०२० पासून जे. पी. नड्डा यांनी ही धुरा सांभाळली. या काळात भाजपने देशपातळीवर मोठी आणि निर्णायक कामगिरी केली.
आता भाजपने पक्षाची सूत्रे नव्या आणि तरुण नेतृत्वाकडे सोपवत नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली असून, या निर्णयाकडे देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.






