जळगाव, 26 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, आदिवासी गोरगरिब, कामगार, ज्येष्ठ नागरिक या सर्व घटकांचा सन्मान राखत त्यांना पुढे नेण्याचा आमचा संकल्प असून जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगींण विकासासाठी शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याचे स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव पोलिस कवायत मैदान येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 76 वा वर्धापन दिन, मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी जिल्हावासीयांना शुभेच्छा देतानां ते बोलत होते.
या समारंभास जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
View this post on Instagram
पालकमंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित लोकप्रतिनिधी, नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देवुन पुढे म्हणाले, आजचा दिवस आपल्या मातृभूमीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना वंदन करण्याचा पवित्र दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळेच आपण आज हा दिवस अनुभवतो आहोत. डॉ.बाबासाहेबांचे शब्द- “जोपर्यंत समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपले कार्य अपूर्ण आहे” या विचाराने प्रेरित होऊन समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे.
View this post on Instagram
जळगाव जिल्हा केवळ केळी व प्लास्टिकसाठीच नव्हे, तर सुवर्ण व्यवसाय, कापूस, डाळ उत्पादन आणि सांस्कृतिक वारशासाठीही ओळखला जातो आणि जिल्ह्याच्या या प्रगतीचा आलेख मांडताना मला अभिमान वाटतो. महिला व बालकल्याणासाठी जळगाव येथे छत्रपती संभाजी नाट्यगृहाशेजारी महिला व बाल विकास भवन उभारण्यात आले असून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, बाल संरक्षण कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र आणि चाईल्ड लाईन ही सर्व कार्यालये एकाच छताखाली कार्यान्वित होत आहेत, त्यामुळे योजनांची अंमलबजावणी अधिक सुलभ होत आहे.
जलजीवन योजनेमुळे ग्रामीण भागात प्रत्येक घराला शुध्द पिण्याचे पाणी देण्याचे उद्दिष्ट साध्य होत आहे. जल जीवन मिशन अंतर्गत 6 लाख 90 हजार 785 कुटूंबांना नळजोडणी देण्यात आलेली असून 1 हजार 80 गावे हर घर जल घोषित झाली आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत या वर्षात 2 हजार 659 वैयक्तीक शौचालयांची कामे पूर्ण झाली असून 2 हजार 285 लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
शेतकऱ्यासांठी महत्त्वपूर्ण पुर्ण निर्णय –
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सन 2024-25 मध्ये खरीप व रब्बी हंगामात मिळून रु.59 कोटी 89 लाख भरपाई थेट शेतक-यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आली आहे. पुनर्रचित हवामानाधारित फळपीक विमा योजनेतून अंबिया बहार हंगामात रु.533 कोटी 48 लाख अनुदान शेतक-यांना देण्यात आले आहे.
‘प्रति थेंब अधिक पीक’ योजनेतून सन 2024-25मध्ये आजतागायत रु.60 कोटी 99 लाख अनुदान शेतक-यांच्या खात्यावर थेट जमा झाले आहे. अतिवृष्टी व अवकाळी पावसासाठी रु.425 केाटी 56 लाख मदतीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. कृषी यांत्रिकीकरणातून रु.11 कोटी 88 लाख अनुदान देण्यात आले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत 363 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून आत्मा योजनेमध्ये रु.1 कोटी 65 लाख निधी खर्च करण्यात आला आहे. जिल्हामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत एकूण १५३ उपकेंद्र मंजुर असून त्यांची क्षमता ८५० मेगावॅट इतकी आहे त्यापैकी ४० उपकेंद्रांमध्ये १२० मेगावॅट एवढी सौरउर्जाद्वारे वीज निर्मिती होत असून एकूण ६० हजार कृषी ग्राहक शेतक-यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होत आहे.
आदिवासीच्या विकासाला चालना –
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत पेसा क्षेत्रातील ६० गावे व २५ पाड्यांचा समावेश असून एकूण ६ लाख ०४ हजार नागरिकांसाठी शिक्षण आरोग्य पोषण व रोजगाराच्या सुविधा सक्षमपणे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. आदिवासी युवक-युवतींच्या कौशल्य व रोजगारासाठी स्पाईस क्लस्टर, स्वयंरोजगार व न्युक्लिअस बजेट योजना राबविण्यात येत आहेत. ५०० शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी जैन इरिगेशनसोबत सामंजस्य करार करण्यात आला असून राणी दुर्गावती योजनेत महिलांना १००% अर्थसहाय्य, वनहक्क कायद्यांतर्गत हजारो आदिवासी कुटूंबांना हक्कपत्रे देण्यात आली आहेत. राज्य शासनाच्या १०० दिवस कार्यक्रमात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांना राज्यात प्रथम क्रमांक मिळालेला आहे.
समाजकल्याण कार्यालयाला राज्यात प्रथम पुरस्कार –
अनुसूचित जाती घटक कार्यक्रमात रु. 93 कोटी निधी मंजुर असून रमाई आवास योजनेत 2 हजार 872 लाभार्थ्यांसाठीच्या घरकुलांना रु. 35 कोटी 60 लक्ष 70 हजार निधीस मंजुरी देण्यात आली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेत 334 वस्त्यांसाठी रु. 44 कोटी रकमेची विकास कामे सुरु आहेत. प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत 8 गावांमध्ये विकास कामे सुरु असून जिल्ह्यातील 12 वसतिगृहांत 945 विद्यार्थी व अनुसुचित जातींसाठी निवासी शाळेत 200 विद्यार्थी मोफत सुविधा घेऊन शिक्षण घेत आहेत. राज्य शासनाच्या 100 दिवस कार्यक्रमात जिल्हा समाजकल्याण कार्यालयाला राज्यात प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
जिल्हा स्तरावर टेलिमेडिसिन कक्ष सुरु –
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर टेलिमेडिसिन कक्ष सुरु करण्यात आला असून, या कक्षाच्या माध्यमातून गर्भवती मातांना आरोग्यच्या सोयी पुरविण्यावर भर दिला जात असून आता पर्यंत जवळपास ५ हजार पेक्षा जास्त महिलांना याचा फायदा झाला आहे.
जिल्ह्याला औद्योगिकदृष्ट्या ‘डी-प्लस’ दर्जा –
जळगाव जिल्ह्याला औद्योगिकदृष्ट्या ‘डी-प्लस’ दर्जा प्राप्त झाल्यामुळे येथे नव्या उद्योगांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहे. राज्याच्या नवीन औद्योगिक धोरणामुळे जळगाव जिल्ह्याला औद्योगिक क्रांतीची सुवर्णसंधी मिळाली असून यामुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल.
जिल्हा वार्षिक योजनेतून विकासाला चालना –
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2025–26 या आर्थिक वर्षात मध्ये रु.677 कोटी नियतव्यय मंजुर असून रु.402 कोटी 60 लाख शासनाकडून प्राप्त झालेला आहे. पैकी रु.147 कोटी 03 लाख निधी खर्च झालेला असून एकूण रु.481 कोटी 88 लाख रकमेच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती उपयोजना रु.93 कोटी, आदिवासी घटक रु.26 कोटी 60 लाख, आदिवासी बाह्य क्षेत्रासाठी रु.38 कोटी 02 लाख निधी मंजूर आहे.
नैसर्गिक आपत्ती मदत –
आपत्तीमुळे ८ लाख २४ हजार ५२० शेतक-यांच्या ६ लाख ३ हजार ३० हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले असून नुकसानीसाठी एकूण रु.६८३ कोटी ४३ लाख ४९ हजार अनुदान मंजूर केले आहे. यापैकी ५ लाख ५१ हजार २९२ बाधित शेतकऱ्यांना DBT प्रणालीद्वारे रु.४२८ कोटी ३६ लाख ०५ हजार अनुदान व इतर मदत करीता रु.६१० कोटी ४६ लाख अनुदान वितरित करण्यात आले आहे.
पालकमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार वितरण-
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यावतीने ध्वज निधी संकल्प योजनेतंर्गत ध्वज निधी संकलन उत्कृष्ट कार्याबद्दल केल्याबद्दल जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले.
पोलिस, वनविभाग, पशुसंवर्धन, समाजकल्याण, महानगरपालिका, शिक्षण या विभागांना पालकमंत्रयाचे हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. क्रिडा विभाअंर्तगत विविध गुणवंत खेळाडुंचा तसेच कृषी विभाग अंर्तगत उत्कृष्ट शेतीशाळा आयोजन स्पर्धा, उत्कृष्ट पीक प्रात्याक्षित गटात कृषी विभागाच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना यावेळी पुरस्कार वितरण करण्यात आले.
परेड संचलन व सांस्कृतीक कार्यक्रमांचे सादरीकरण –
पोलीस कवायत मैदानावर, स्काऊट गाइड, एनसीसी, एनएसएस, पोलीस पुरुष महिला पथक, होमगार्ड, पोलीस बॅंड पथक, अग्निशमन दल, आरोग्य सेवा, चित्ररथ आदिंनी परेड संचालनात सहभाग होता. तसेच विविध शालेय विदयार्थ्यानी लेजिम, योग, यांच्यासह विविध सास्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.






