भडगाव, 31 जुलै: तालुक्यात आज 31 जुलै रोजी झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. बात्सर गावात नदीला आलेल्या पुरामुळे शेतातील मजुरांच्या घरांना पाण्याने वेढा पडल्याने काही जण अडकून पडली होती. याबाबतची माहिती मिळताच आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग, पोलीस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत यशस्वी बचावकार्य राबविले.
भडगाव तालुक्यातील बात्सर येथे बचाव कार्य –
मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्याने ५ लहान बालके व ३ महिला घरात अडकून पडल्या होत्या. यामध्ये सर्व ५ बालके व ३ महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, त्यांची गावातच सुरक्षित निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या सर्वजण सुरक्षित असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
View this post on Instagram
बचावकार्यात तहसीलदार शीतल सोलाट, पोलीस निरीक्षक टाक, समन्वय समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक युवराज पाटील, सुधाकर पाटील, भुरा आप्पा पाटील, महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस प्रशासन तसेच ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
भडगाव तालुक्यात जोरदार पावसाचा तडाखा –
भडगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवणी, शिंदी व पेडगाव परिसरातील कापूस, मका, केळी, ऊस, मूग आणि उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
आमदारांनी दिली आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांना माहिती –
शिवणी येथे कॅनॉलमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने कॅनॉल फुटून गावात पाणी घुसले. परिणामी अनेक घरांमध्ये अडीच ते तीन फूट पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर आप्पा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. याशिवाय जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याशीही संपर्क साधून तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली.
प्रशासनाकडून पूरग्रस्त भागांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून बाधित नागरिकांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे काम सुरू आहे. तसेच नुकसानीचे पंचनामे करून शेतकरी व पूरग्रस्तांना शासनाकडून तातडीची मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
हेही वाचा: Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट






