मुंबई, 31 जानेवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाला अपघात झाल्याची घटना घडली. या अपघाताने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावरून हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील अत्यंत अनुभवी आणि प्रभावी नेते होते, त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? –
येत्या 23 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच अर्थ खात्याची जबाबदारी होती आणि यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्याची तयारीही अंतिम टप्प्यात होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, यंदाच्या अर्थसंकल्पाची संपूर्ण तयारी अजित पवार यांनीच केली होती. अर्थसंकल्पातील सर्व प्रक्रिया, आकडेवारी आणि नियोजन आधीच पूर्ण झाले असून, त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, उद्या अर्थसंकल्पाशी संबंधित उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यात येतील. त्यानंतर राज्य सरकार स्तरावर चर्चा करून अर्थसंकल्प कोण सादर करणार, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. सध्याच्या परिस्थितीत योग्य निर्णय घेणे आवश्यक असून, त्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : मोठी बातमी! महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवार घेणार आज शपथ






