मुंबई, 31 जानेवारी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची सुनेत्रा पवार यांनी आज 31 जानेवारी सायंकाळी 5 वाजता शपथ घेतली. मुंबईतील लोकभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद व गोपनियतेची दिली. याबरोबरच, सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत.
View this post on Instagram
या शपथविधी सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महायुती सरकारमधील मंत्री तसेच आमदार उपस्थित होते. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी ‘अजित दादा अमर रहे’ अशा घोषणा दिल्याचे पाहायला मिळाले.
सुनेत्रा पवार यांच्याकडे ३ खात्यांची जबाबदारी –
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा, युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक विकास ही महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत. एकूण तीन खात्यांची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ मंत्रालयाचा प्रभार स्वतःकडेच ठेवला आहे. राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होणार असून तोपर्यंत अर्थ खात्याची जबाबदारी फडणवीस यांच्याचकडे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड –
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. आज विधानभवनात दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह आमदार दाखल झाल्या. यावेळी अजित दादांना अभिवादन करण्यात आले. यानंतर सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवडीचा प्रस्ताव दिलीप वळसे-पाटील यांनी मांडला, तर छगन भुजबळ यांच्याकडून या प्रस्तावाला अनुमोदन देण्यात आले.
दरम्यान, विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्रीपदासाठी पुढील प्रक्रिया संदर्भात पत्र देण्यात आले होते. यानंतर मुंबईतील लोकभवनात एका छोटेखानी कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांचा हा शपथविधी पार पडला.






