मुंबई, 1 फेब्रुवारी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री स्वतः कोणतीही प्रचारसभा घेणार नसून स्थानिक नेते व पदाधिकारी प्रचाराची जबाबदारी सांभाळणार आहेत.
मुख्यमंत्री स्वतः कोणतीही प्रचारसभा घेणार नाही –
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी 5 फेब्रुवारीपर्यंत प्रचाराची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 7 दिवसांत 22 प्रचारसभा नियोजित होत्या. मात्र अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमात बदल केला आहे. त्यानुसार, 5 फेब्रुवारी रोजी होणारे मतदान आता 7 फेब्रुवारी रोजी होणार असून मतमोजणीची तारीख 9 फेब्रुवारी करण्यात आली आहे.
अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू –
अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी एका विमान अपघातात निधन झाले. ते सकाळी खाजगी विमानाने मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला असून या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला.
अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यभरात शोककळा पसरली आहे. 29 जानेवारी रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात लाखो समर्थक, चाहते आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी






