मुंबई, 10 फेब्रुवारी : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज मंगळवारी 10 फेब्रुवारी रोजी आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. 28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर 31 जानेवारीला त्यांनी शपथ घेतली होती. दरम्यान, पदभार स्वीकारताना हा क्षण भावनिक ठरला; यावेळी उपस्थित पार्थ पवार आणि आदिती तटकरे यांना अश्रू अनावर झाले.
उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला –
अजित दादांच्या निधनांतर सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर सुनेत्रा पवार या आज सकाळी पहिल्यांदाच मंत्रालयात दाखल झाल्या आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारत विधीवत कामकाजाला सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, सुनिल तटकरे तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अन्य मंत्री आणि अनेक आमदार उपस्थित होते.
View this post on Instagram
सिद्धिविनायक मंदिर आणि चैत्यभूमीला भेट –
राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. श्री. गणरायांचे दर्शन घेऊन त्यांनी राज्याच्या समृद्धीसाठी आणि नवीन जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आशीर्वाद घेतले. त्यानंतर, त्यांनी दादर येथील चैत्यभूमीलाही भेट देऊन महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज मंगळवारी सकाळी सुमारे अकरा वाजता मंत्रालयात दाखल झाल्या. त्यापूर्वी, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या कार्यालयात जाऊन दिवंगत पती व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी विधीवत उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’वर भावना व्यक्त करताना, सुनेत्राकाकींना पाहताना मनात एकाच वेळी आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावना दाटून आल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! राज्यात 70 हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती, नव्या पद्धतीने भरती होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






