मुंबई, 14 मार्च: महाराष्ट्राचे राज्यपालांचे निवासस्थान राजभवन मुंबई येथे आहे. या राजभवनाशी संबंधित महत्त्वाचे किस्से, महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या वतीने ‘राजभवनाचे किस्से’ ही विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून राजभवनातील माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याद्वारे लिखित एक विशेष लेख दर आठवड्याला प्रकाशित केला जातो. दरम्यान, आता या राजभवनाचे नाव बदलून लोकभवन करण्यात आले आहे. त्यामुळे आता आमच्या किस्से राजभवनाचे या मालिकेचे नावही आम्ही किस्से लोकभवनाचे असे करत असून या मालिकेचा हा 19वा लेख आहे.
मलबार हिल येथील महाराष्ट्र लोकभवन स्वातंत्र्यापूर्वी मुंबई प्रांताच्या ब्रिटिश गव्हर्नरचे ‘गव्हर्मेंट हाऊस’ होते. दिनांक १८ सप्टेंबर १९३७ ते २४ मार्च १९४३ ही साडेपाच वर्षे मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर होते सर लॉरेन्स रॉजर लमली.
स्वातंत्र्य लढा अतिशय महत्वाच्या टप्प्यावर आला असताना, द्वितीय महायुद्ध सुरु झाले असताना व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सन १९४२ साली मुंबईतूनच ‘छोडो भारत’ आंदोलन सुरु झाले असताना रॉजर लमली मुंबईचे गव्हर्नर होते.
रॉजर लमली यांची नात – सिसिलिया कोल यांनी दिनांक २३ मार्च २०११ रोजी आपल्या मुंबई भेटीत राजभवनाला भेट दिली होती. लंडन येथे लहान मोठ्या उद्योगांसाठी लेखा नोंदणीचे काम करीत असलेल्या सिसिलिया कोल यांनी परत गेल्यावर आपल्या आठवणी लिहून पाठवल्या होत्या व आपल्या आजोबांची काही छायाचित्रे देखील पाठवली होती.
आपल्या आईने तिच्या बालपणातील ६ वर्षे ज्या ठिकाणी व्यतीत केले, त्या ठिकाणी भेट देणे हा माझ्याकरिता अतिशय भावूक अनुभव होता असे त्यांनी सांगितले.
पुढील आठवणी त्यांच्याच शब्दात:
राजभवन प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता; याबद्दल मी खूप ऐकले होते, आणि आता मी माझ्या आईच्या जुन्या छायाचित्रांकडे नव्या कुतूहलाने पुन्हा पाहीन.
सर रॉजर लमली हे माझे आजोबा होते. त्यांची तिसरी मुलगी ऍन रिडली ही माझी आई होती. ती वयाच्या ९ ते १५ वर्षांपर्यंत आपल्या आई-वडिलांसोबत राजभवनात राहत होती. माझी मावशी एलिझाबेथ मुंबईत शाळेत जात होती, तर माझ्या आईने घरूनच शिक्षण घेतले.
माझ्या आजोबांचे सन १९६९ साली निधन झाले, त्यावेळी मी १३ वर्षांची होते. आमचे कुटुंब आणि चुलत भावंडे दरवर्षी ख्रिसमसच्या वेळी आजी आजोबांकडे यॉर्कशायरमध्ये एकत्र येत असू, आमच्या लहानपणी ते आमच्यासाठी थोडे दूरचे व्यक्तिमत्त्व होते; तरीही माझ्या आठवणीत ते प्रेमळ, शांत स्वभावाचे आणि आदरणीय असे व्यक्तिमत्त्व होते.
माझ्या आठवणीप्रमाणे त्यांची विनोदबुद्धीही थोडी सूक्ष्म आणि रुक्ष होती. माझ्या आईने ज्या ठिकाणी आपल्या बालपणातील सहा वर्षे घालवली आणि ज्या परिसराच्या तिच्या अतिशय गोड आठवणी होत्या, त्या ठिकाणी प्रत्यक्ष उभे राहण्याचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी होता.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मला आपलेपणाने स्वागत करण्यासाठी आणि राजभवनातील घर व परिसर दाखवण्यासाठी आपण सर्वांनी घेतलेल्या कष्टांमुळे मी मनापासून भावूक झाले. राजभवनाचे स्थान इतके भव्य आणि निसर्गरम्य आहे, समुद्राकडे दिसणारे ते अद्भुत दृश्य मला पूर्वी कल्पनाही नव्हती. निवासस्थानाची इमारतही अत्यंत देखणी आणि आकर्षक आहे.
मला वृक्षवल्ली आणि बागकामाची आवड आहे. त्यामुळे माझ्या आजोबांच्या काळात जशी बाग होती, तशीच अजूनही आहे का, असा विचार माझ्या मनात आला. आम्ही मार्च महिन्यात भेट दिली तेव्हा बाग अतिशय सुंदर दिसत होती.
**
“Sir Roger Lumley was my grandfather. His third daughter, Anne Ridley, was my mother who lived at Raj Bhavan with her parents from the age of 9 to 15. My aunt Elizabeth went to school in Bombay, my mother learnt at home. He died in 1969 when I was 13.
My family and our cousins spent Christmas in Yorkshire where he and my grandmother lived. He was a fairly distant figure to us children, my memory though is of him being kind, rather quiet and someone to be looked up to. I get the impression that he had a dry sense of humour. I found the experience of being in the place where my mother had spent 6 years of her childhood, of where she had very fond memories, very moving. Above all, I was very touched at the trouble you all took to make me feel welcome and to show me around the house and the garden. I hadn’t realised the magnificence of the site of Raj Bhavan, with all those wonderful views across the ocean, and the house itself is very attractive. I am interested in plants so I did wonder if the garden planting was much the same as in my grandfather’s day ( it was terrific when we visited in March!)
सिसिलिया कोल यांनी पाठवलेली छायाचित्रे व त्यांची माहिती छायाचित्रांसोबत दिली आहे.
लेखन – श्री. उमेश काशीकर (माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी, लोकभवन, मुंबई)






