मुंबई, 13 एप्रिल: ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे आज मुंबईतील बीच कँडी रुग्णालय येथे निधन झाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या राहत्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, आमदार सुनील शिंदे, आमदार प्रसाद लाड यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.
आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार –
सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे काल 12 एप्रिल रोजी दुपारी निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मल्टी ऑरगन फेल झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. दरम्यान, सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज, दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक –
सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली.
आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला.
मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये 12,000 वर गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर…’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले’, असे म्हणाल्याही होत्या.
दरम्यान, त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.






