ईसा तडवी, प्रतिनिधी
बहुलखेडा, 14 जुलै: सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. बहुलखेडा गावचे सुपुत्र आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) संजय गफुर तडवी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. सोमवार, दिनांक १३ जुलै २०२६ रोजी हा कार्यक्रम पार पडला.
नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून गावातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल आणि कंपास बॉक्स अशा आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी पीएसआय संजय तडवी यांच्यासोबत त्यांचे वडील गफुर रशीद तडवी, ईदबार तडवी, दगडू तडवी, फारुख तडवी, रुबाब तडवी, मुनीर तडवी, जाकीर तडवी, सुलतान तडवी, जुम्मा तडवी, शोएब तडवी आणि खालिद देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक वृंद, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या गावातीलच एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने शाळेतील मुलांसाठी दाखवलेल्या या आपुलकीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत असून, शिक्षकांनी व पालकांनी संजय तडवी व त्यांच्या परिवाराचे आभार मानले आहेत.






