जळगाव, 2 सप्टेंबर : जालन्यात मराठा आंदोलकांवर काल लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते आज जळगावात आले असता त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. जालना येथे लाठीचार्जला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच जी घटना घडली तिचा निषेध व्यक्त करतो असेही ते यावेळी म्हणाले.
आमदार रोहित पवार पुढे म्हणाले की, लाठीचार्ज हा गृह मंत्रालयाच्या आदेशावरून होतो. तसेच जालना येथे लहान मुले, महिला, वृध्द, तरुण अशा सर्वांवर पोलिसांनी लाठी चार्ज केला. लाठीचार्जची जबाबदारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. दबावतंत्राचा माध्यमातून जे रक्त तुम्ही जालना येथे सांडले आहे, त्याचे एकच उत्तर असू शकते, आणि ते म्हणजे राजीनामा. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माझी तसेच आमच्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने आहे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.