जळगाव, 3 जून: गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली शहराजवळ धुळे-सुरत महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (MSRTC) दोन एसटी बसमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. यात ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर सुमारे ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघात झालेली एक बस जळगाव जिल्ह्यातील जामनेर आगाराची (जामनेर-सुरत) होती. ही बस मंगळवारी सकाळी साडेसात वाजता सुरतकडे रवाना झाली होती.
दरम्यान, बारडोली जवळच्या उवा गावानजीक महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या दोन बसेसमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. यामध्ये 7 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर जखमींवर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातात जामनेर बसचे चालक घनश्याम बरकले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच बसला लागलेली आग अत्यंत भीषण असल्यामुळे मरण पावलेल्या प्रवाशांच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून सुरतचे जिल्हाधिकारी तसेच स्थानिक प्रशासनासोबत जळगाव जिल्हा प्रशासनाच्यावतीने संपर्क करण्यात आला असल्याची माहिती जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली आहे.
जळगावचे विशेष पथक गुजरातला रवाना –
जळगाव जिल्हा प्रशासनाने सुरतमधील बारडोली येथील जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधला आहे. जळगाव जिल्ह्यातील जखमी व मयतांना परत आणण्यासाठी प्रशासनाची एक विशेष पथक गुजरातला रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
शासनाच्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन –
दरम्यान, बस अपघातातील जखमींमध्ये जळगावच्या पाचोरा येथील एका प्रवाशाचा समावेश असून, त्यांची प्रकृती सध्या सुखरूप आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनी इतर कुठल्याही गोष्टींव विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त –
सुरतच्या बस अपघात प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना केली. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून प्रशासन अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत पुरवत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी या अपघातातील मृताच्या वारसाला ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’ (पीएमएनआरएफ) मधून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल, असेही मोदी यांनी म्हटले आहे.
एसटी महामंडळाकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर –
गुजरात राज्यातील सुरतजवळ उवा गावाजवळ झालेल्या एसटी महामंडळाच्या भीषण बस अपघातातील मृत प्रवाशांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या अपघातातील जखमी प्रवाशांवरही मोफत व सर्वोत्तम उपचारांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
अपघात नेमका कसा घडला? –
महाराष्ट्र राज्य परिवन मंडळाची एक एसटी बस धुळ्याहून नवापूर मार्गे सुरतच्या दिशेने जात होती. याच दरम्यान समोरून येणाऱ्या दुसऱ्या एसटी बसची तिच्यासोबत जोरदार धडक झाली. सुरत जिल्ह्यातील बारडोलीच्या उवा गावाजवळ हा अपघात झाला. दरम्यान, दोन्ही बसची जोरदार धडक होताच एक बस हायवेवर पलटी झाली आणि एका मोठ्या धमाक्यासह पेट घेतला. आगीची तीव्रता इतकी भयानक होती की, बसमधील ७ प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि त्यांचा जागीच होरपळून अंत झाला.






