नवी दिल्ली, 25 जुलै: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज 25 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सादर केला. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि त्याविरोधात उभ्या राहिलेल्या तीव्र जनआक्रोशामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.
राजीनाम्याची घोषणा करताना धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर विद्यार्थ्यांना उद्देशून एक पत्रही प्रसिद्ध केले. देशातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य, राष्ट्रीय एकात्मता आणि सुरू असलेल्या आंदोलनाचा अधिक गैरफायदा होऊ नये, या उद्देशाने आपण पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. विद्यार्थ्यांचे हित हेच सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
…..अन् अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा दिला राजीनामा –
गेल्या काही आठवड्यांपासून दिल्लीतील जंतरमंतरसह देशातील अनेक शहरांमध्ये विद्यार्थी आणि विविध संघटनांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू केले होते. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याच्या मागण्यांसह शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात येत होती. आंदोलन अधिक तीव्र होत असताना केंद्र सरकारवर दबाव वाढत गेला आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिला.
अभिजीत दीपके यांची प्रतिक्रिया –
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे देशाच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली असून, केंद्र सरकार आता नवीन शिक्षणमंत्र्यांची नियुक्ती कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांबाबत केंद्र सरकार पुढे कोणती भूमिका घेते, हे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपके यांची प्रतिक्रिया –
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या घडामोडीचे स्वागत करत हा विद्यार्थी आणि जनतेच्या एकजुटीच्या संघर्षाचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली. “आपण करून दाखवलं… धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे,” असे म्हणत त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे आणि नागरिकाचे अभिनंदन केले.
यावेळी त्यांनी लोकशाहीत अन्यायाविरोधात निर्भयपणे आवाज उठवण्याचे आवाहन केले. तसेच, नीट (NEET) प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची भरपाई मिळेपर्यंत आणि आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.






