पाचोरा, 9 जून : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA) अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र लोहटार येथे गरोदर मातांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर तसेच पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
शिबिरामध्ये एकूण 42 गरोदर मातांची तपासणी –
लोहटार येथील शिबिरामध्ये एकूण 42 गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. यामध्ये अति जोखीम असलेल्या गर्भवती माता, अति तीव्र रक्तक्षयग्रस्त माता तसेच उच्च रक्तदाब असलेल्या मातांची विशेष तपासणी करण्यात आली. सर्व गर्भवती महिलांची आवश्यक रक्त तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी, रक्तदाब मोजणी, वजन, उंची तसेच पोटाच्या घेराची तपासणी करण्यात आली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन पाटील यांनी गरोदरपणातील योग्य आहार, नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व, मातृ व बाल आरोग्य संवर्धन तसेच संभाव्य गुंतागुंत टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा आरोग्य सहाय्यक राजेश कुमावत, तालुका आरोग्य सहाय्यक प्रल्हाद वामन दामोदरे, आरोग्य सहाय्यिका संगीता साठे, आरोग्य सहाय्यक दीपक दीक्षित, चिंतामण पाटील, बापू महारू मोरे (कनिष्ठ सहाय्यक), आरोग्य सेविका योगिता खैरनार, आरोग्य सेवक जितू पाटील, गटप्रवर्तक, आशा व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. तसेच संजय पाटील व तृप्तेश निकम यांनी शिबिराच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विशेष परिश्रम घेतले.






