नवी दिल्ली, 17 जून: महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठा आणि धक्कादायक राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ९ पैकी तब्बल ६ लोकसभा खासदार फुटले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बहुचर्चित ‘ऑपरेशन टायगर’ अखेर यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे. आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या अतिशय वेगवान राजकीय घडामोडींनंतर, या सर्व बंडखोर खासदारांनी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी अधिकृत मंजुरी मिळवली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांचा शिंदे सेनेत विलीन होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.
दिल्लीत वेगवान घडामोडी –
गेल्या दोन दिवसांपासून नवी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला असून ठाकरे गटाचे ६ खासदार अचानक ‘नॉट रिचेबल’ झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे तातडीने दिल्लीत दाखल झाले. बंडखोर खासदारांनी काल रात्रीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी अर्ज दिला होता. आज या अर्जाला मंजुरी मिळाल्याने ठाकरे गटाला मोठा कायदेशीर आणि राजकीय धक्का बसला आहे. दरम्यान, आता फक्त अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे ३ खासदार उद्धव ठाकरेंसोबत उरले आहेत.
एकतर्फी निर्णय न घेण्याची ठाकरे गटाची विनंती –
बंडखोरीची कुणकुण लागताच ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना 4 पानांचे पत्र लिहून एकतर्फी निर्णय न घेण्याची विनंती केली होती. तसेच पक्षाने खासदारांना व्हीप (आदेश) देखील बजावला होता. परंतु, खासदारांनी व्हीप बजावण्यापूर्वीच स्वतंत्र गटासाठी अर्ज केल्यामुळे हा व्हीप कायदेशीररित्या निष्फळ ठरल्याचा दावा बंडखोर गटाने केल्याचे सांगितले जात आहे.
बंडखोर खासदारांमध्ये यांचा आहे समावेश –
ओमराजे निंबाळकर (धाराशिव), संजय जाधव (परभणी), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी), संजय दिना पाटील (मुंबई उत्तर-पूर्व (ईशान्य मुंबई)) या ६ खासदारांच्या बंडखोरी केल्याच्या गटात समावेश असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडे लोकसभेत एकूण ९ खासदार होते. पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई टाळण्यासाठी किमान दोन-तृतीयांश (२/३) म्हणजेच ६ खासदारांची गरज होती. या ६ खासदारांनी एकत्र येऊन गट स्थापन केल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची शक्यता कमी झाली असल्याचेही बोलले जात आहे.
वर्धापनदिनी अधिकृत प्रवेशाची शक्यता –
ऑपरेशन टायगरच्या मुद्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. खासदारांना कोट्यवधी रुपयांचे प्रलोभन देऊन चार्टर्ड विमानाने पळवून नेल्याचा आरोप त्यांनी केला आणि याला ‘ऑपरेशन गद्दारी’ असे नाव दिले. दुसरीकडे, १९ जून रोजी असणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात अधिकृत प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, या मोठ्या फुटीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे.
हेही वाचा: पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक






