ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 17 जून: पाचोरा शहरात दिवसाढवळ्या घरात घुसून जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पाचोरा पोलिसांनी अवघ्या एका दिवसात पर्दाफाश करत तीन आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईत चोरीस गेलेली रोकड व गुन्ह्यात वापरण्यात आलेले बनावट पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कुसुम एकनाथ मोकळे (वय ४२, रा. सातगाव डोंगरी, सध्या लक्ष्मी आंगण कॉलनी, पाचोरा) यांच्या घरी आरोपी चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतेकर आणि त्याच्या दोन साथीदारांनी ‘अॅमेझॉनचे पार्सल आले आहे’ असे सांगून प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या मुलांना एका ठिकाणी बसवून बंदुकीचा धाक दाखवत घरातील सोन्याच्या चिपांची मागणी केली. कपाटातील सामान अस्ताव्यस्त करून आरोपींनी ७ हजार रुपये रोख तसेच मुलाच्या गळ्यातील ७०० रुपये घेऊन पलायन केले. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी १३ जून रोजी मुख्य आरोपी चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतेकर (वय २१, रा. सातगाव डोंगरी) याला अटक केली. चौकशीत त्याचा मामा गोकुळ महादू वाघ (पाटील) याचा सहभाग समोर आला. तसेच योगेश परशराम शिंदे (वय ३१, रा. शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीस गेलेली ७,७०० रुपयांची रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले खेळण्यातील बनावट पिस्तूल जप्त करण्यात आले.
तपासात फिर्यादीच्या घरात सोन्याच्या चिपा असल्याची माहिती गोकुळ वाघ याला मिळाली होती. त्याने ही माहिती नितीन पाटील याला दिली. त्यानंतर नितीन पाटीलने आपल्या परिचयातील दोन व्यक्तींना बोलावून घेत चेतन भुतेकरसोबत चोरीचा कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच गोकुळ वाघ आणि नितीन पाटील यांनी आरोपींना गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त केल्याचेही तपासात उघड झाले आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील आणखी एका संशयिताचा शोध सुरू असून पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत.






