नागपूर (प्रतिनिधी), 22 जून : भारतासह जगभरात वायू प्रदूषण ही सार्वजनिक आरोग्यासमोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक समस्या बनली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, वायू प्रदूषणामुळे दरवर्षी लाखो लोक विविध श्वसनविकार, ऍलर्जी आणि फुफ्फुसांच्या आजारांना बळी पडतात. बाह्य वायू प्रदूषणाबरोबरच घरातील (Indoor Air Pollution) हवा देखील चिंतेचा विषय बनली असून शाळा, महाविद्यालये, कार्यालये, रुग्णालये आणि सार्वजनिक इमारतींमध्ये हवेत आढळणारे जीवाणू, बुरशीचे बीजाणू आणि इतर जैविक कण आरोग्यास गंभीर धोका निर्माण करीत आहेत. याचबरोबर धान्य साठवण केंद्रांमध्ये बुरशीजन्य संसर्गामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात धान्याची नासाडी होत असून अन्नसुरक्षेसमोरही आव्हान निर्माण होत आहे.
या वाढत्या समस्यांवर प्रभावी उपाय ठरू शकणाऱ्या “A Filtration System for Reduction of Airborne Microbial Load in Indoor and Grain Storage Environments” या अभिनव संशोधनाचे भारतीय पेटंट कार्यालय, भारत सरकारकडून अधिकृत पेटंट प्रकाशन करण्यात आले आहे. हरित नॅनोतंत्रज्ञानावर आधारित हे स्वदेशी संशोधन भविष्यात स्वच्छ हवा, सार्वजनिक आरोग्य संरक्षण आणि सुरक्षित धान्य साठवण व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे. दर्शन रामभाऊजी तळहांडे (सहाय्यक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, शरदचंद्र महाविद्यालय, नायगाव, जि. नांदेड) , अजिंक्य बोरकर (संशोधक, ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावती), प्रा. डॉ. सुवर्णा पाटील (प्राध्यापक व विभागप्रमुख, वनस्पतीशास्त्र विभाग, तायवाडे महाविद्यालय, कोराडी, नागपूर) आणि प्रा. डॉ. सचिन तिप्पट (प्राध्यापक व विभागप्रमुख, पर्यावरणशास्त्र विभाग, नरसम्मा महाविद्यालय, अमरावती) यांनी संशोधन कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच या संशोधनासाठी SEER Bharat Foundation यांचे आर्थिक सहकार्य लाभले.
संशोधकांनी हरित नॅनोतंत्रज्ञानाचा वापर करून सिल्व्हर (AgNPs), झिंक ऑक्साइड (ZnO) आणि कॉपर ऑक्साइड (CuO) नॅनोकणांनी युक्त विशेष प्रतिजैविक गाळणी प्रणाली विकसित केली आहे. या नॅनोकणांचे संश्लेषण वनस्पती अर्कांच्या सहाय्याने पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आले असून त्यांचा विशेष लेप एअर फिल्टरवर देण्यात आला आहे. त्यामुळे फिल्टर केवळ धूळ किंवा सूक्ष्मजीव अडकवत नाही तर त्यांचा नाश करण्यासही मदत करतो.
संशोधनादरम्यान वर्गखोल्या व कार्यालयांमध्ये केलेल्या चाचण्यांमध्ये हवेत असलेल्या जीवाणूंच्या प्रमाणात 72.7 टक्के घट नोंदविण्यात आली. जीवाणूंची संख्या 3024 CFU/m³ वरून 824 CFU/m³ पर्यंत कमी झाली. त्याचप्रमाणे बुरशीचे प्रमाण 2082 CFU/m³ वरून 688 CFU/m³ पर्यंत घटून 66.9 टक्के नियंत्रण साध्य झाले. धान्य साठवण गोदामांमध्ये जीवाणूंच्या प्रमाणात 68.3 टक्के आणि बुरशीच्या प्रमाणात 68 टक्के घट आढळून आली. Aspergillus, Penicillium, Cladosporium, Alternaria, Bacillus, Staphylococcus, Pseudomonas यांसारख्या आरोग्यास आणि अन्नसुरक्षेस घातक सूक्ष्मजीवांवरही प्रभावी नियंत्रण मिळाल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
संशोधनातील निष्कर्षांनुसार, सिल्व्हर नॅनोकणयुक्त फिल्टर जीवाणू नियंत्रणासाठी सर्वाधिक प्रभावी ठरले, तर झिंक ऑक्साइड नॅनोकणयुक्त फिल्टरने बुरशी नियंत्रणात सर्वोत्तम कार्यक्षमता दर्शविली. विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया हरित तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे ती पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि कमी खर्चिक आहे.
हे तंत्रज्ञान शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, रुग्णालये, संशोधन प्रयोगशाळा, कार्यालये, अन्न प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, धान्य साठवण केंद्रे, वेअरहाऊसेस तसेच सार्वजनिक इमारतींमध्ये वापरता येऊ शकते. वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर घरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि धान्य साठवणुकीतील बुरशीजन्य नुकसान कमी करण्यासाठी हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
या पेटंट प्रकाशनामुळे भारतीय संशोधन क्षेत्रात आणखी एका महत्त्वपूर्ण बौद्धिक संपदेची भर पडली असून संशोधकांवर शैक्षणिक, वैज्ञानिक व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






