मुंबई, 2 जुलै: वेरूळ (ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. याबाबतचा अंतिम वैद्यकीय अहवाल आणि व्हिसेरा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषदेत सदस्य विक्रम काळे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्ष्यवेधी सूचनेला उत्तर देताना डॉ. भोयर बोलत होते. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य संजय खोडके, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.
नेमकं प्रकरण काय? –
राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले की, वैजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील फरारी आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास अधिकारी फिर्यादी व त्याच्या साथीदारांसह शासकीय वाहनाऐवजी खासगी वाहनाने खुलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेरूळ येथे गेले होते. संबंधित पोलीस ठाण्याला पूर्वकल्पना किंवा परवानगी न देता ही कारवाई करण्यात आल्याने नियमांचे उल्लंघन झाले. त्यानंतर झालेल्या वादातून शिक्षक सुरेश बोरसे यांना मारहाण झाली.
दरम्यान, या घटनेत ते गंभीर जखमी झाले आणि औषधोपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुरेश बोरसे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून ११ जून २०२६ रोजी खुलताबाद पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे यांच्यासह सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे.
दोघांना केलं निलंबित –
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे आणि पोलीस अंमलदार बनगे यांना निलंबित करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालात मृत व्यक्तीस Coronary Artery Disease असल्याचे नमूद करण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी हिस्टोपॅथॉलॉजी आणि रासायनिक विश्लेषणासाठी (व्हिसेरा)नमुने जतन करण्यात आले आहेत. अंतिम वैद्यकीय अभिप्राय आणि व्हिसेरा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपींविरुद्ध आवश्यक त्या कायदेशीर कलमांनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले.






