ईसा तडवी, प्रतिनिधी
लासगाव (पाचोरा), 29 नोव्हेंबर: राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले एनसीएमसी कार्ड अद्याप न काढलेल्या लाभार्थ्यांसाठी पाचोरा आगारातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील लासगाव येथे रविवार, २९ नोव्हेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार प्रतिबंध असोशिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत दुसाने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिराला गावातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शासनाच्या एसटी प्रवास सवलत योजनांचा लाभ घेताना एनसीएमसी कार्डची आवश्यकता असल्याने गावातील पात्र लाभार्थ्यांना कार्ड काढण्यासाठी होणारी धावपळ टाळता यावी, तसेच त्यांना गावातच ही सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पाचोरा आगारप्रमुख मनोज भोई यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १०० हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
शिबिरात लाभार्थ्यांची नोंदणी, आवश्यक कागदपत्रांची तपासणी आणि कार्ड काढण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी पाचोरा आगारातील स्थानक प्रमुख मयुर काळे तसेच कार्ड काढण्यासाठी कृष्णा पाटील आणि बबन सोमवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंदा पैठणकर, ठाणसिंह चत्रू पाटील, जगन्नाथ महाजन, चंद्रकांत दुसाने, पंकज पाटील, रोहित तायडे, महेश पाटील, गिरीश बडगुजर, संग्रामसिंह पाटील, विशाल पाटील, महेश बडगुजर, पुर्वेश पाटील, हर्षल धनगर यांच्यासह लासगाव ग्रामस्थांनी सहकार्य केले.
हेही वाचा: जळगावचा जलसंधारण पॅटर्न राज्यभर राबविणार; लोकसहभागातून दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न – मंत्री संजय राठोड






