मुंबई, 9 जुलै: राज्यात गोवंश संरक्षणासाठी विद्यमान कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी केली जात असून, गो-तस्करी व अवैध गोवंश वाहतुकीविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. वारंवार गो-तस्करीसाठी वापरली जाणारी वाहने आढळल्यास त्यांचे नोंदणी परवाने रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार असून, सराईत गुन्हेगारांवर मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री भोयर बोलत होते.
राज्यमंत्री भोयर म्हणाले की, राज्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व गोवंश हत्या बंदी कायदा प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. गो-तस्करीची माहिती देणाऱ्या गोरक्षक व तक्रारदारांची नोंद ठेवली जाते. अवैध गोवंश वाहतुकीसाठी वापरलेली वाहने जप्त करून न्यायालयाच्या आदेशानंतरच सोडण्यात येतात. मात्र, अशा वाहनांचा पुन्हा गुन्ह्यासाठी वापर झाल्याच्या १७ घटना निदर्शनास आल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानुसार वारंवार पकडल्या जाणाऱ्या वाहनांचे नोंदणी परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव शासन विचाराधीन आहे.
राज्यात २०२५ मध्ये गोवंश कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १,१९५ गुन्ह्यांची नोंद झाली असून, त्यामध्ये ९ लाख ८१ हजार ७३६ किलो गोमांस जप्त करण्यात आले. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळा परिसरात ५७ टन मांसाचे दोन कंटेनर जप्त करण्यात आले. या प्रकरणाच्या सखोल तपासानंतर हैदराबाद येथील संबंधित कत्तलखाना बंद करण्यात आला असून परिसरातील आणखी चार ते पाच बेकायदेशीर कत्तलखान्यांवरही कारवाई करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले की, २७ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व पशुधनासाठी १२ अंकी बारकोडयुक्त ईअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीमध्ये करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे पशुधनाची प्रजनन, आरोग्य व मालकीची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे.
गोसेवा आयोगाच्या बैठकीनंतर गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल व अनधिकृत कत्तलखान्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी तसेच संबंधित कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय शिक्षेचा कालावधी व दंड वाढविणे, गोसेवा आयोगाला अधिक अधिकार देणे, विशेष पोलीस पथके स्थापन करणे, जिल्हा व राज्यस्तरीय समित्या गठित करणे, सीमावर्ती तपासणी नाक्यांवर सीसीटीव्ही बसविणे आणि जनजागृती वाढविणे या सूचनांवर शासन सकारात्मक विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील कुरण क्षेत्राचा विकास करून गोवंशासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्यासाठी कॅम्पा निधीचा वापर करण्यात येणार असल्याचे सांगून, गोवंश संरक्षणासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याची ग्वाही राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.






