ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 12 जुलै: पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित विविध समस्या, नागरिकांच्या तक्रारी आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींवर तोडगा काढण्यासाठी उद्या सोमवार, १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील व्यापारी भवन येथे विशेष संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला आमदार किशोर आप्पा पाटील प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
मतदारसंघात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाची समस्या, कृषी व घरगुती ग्राहकांच्या तक्रारी, स्मार्ट मीटरसंदर्भातील अडचणी तसेच पावसाळ्यातील वीजपुरवठा व्यवस्थेचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. वाढत्या वीजविषयक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, महावितरण आणि लोकप्रतिनिधींना एकाच व्यासपीठावर आणून समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचा प्रयत्न या बैठकीत केला जाणार आहे.
बैठकीस प्रांताधिकारी भूषण अहिरे, पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे, भडगाव तहसीलदार शीतल सोलाट, पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, भडगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती मालगावे, पाचोरा तालुका कृषी अधिकारी सुधाकर कराड, भडगाव तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर, गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, भडगाव गटविकास अधिकारी के. बी. अंजने तसेच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध तक्रारदार नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
मतदारसंघातील वीजविषयक प्रश्नांचा सर्वंकष आढावा घेऊन त्यावर तातडीने निर्णय व्हावेत, विविध विभागांमध्ये समन्वय निर्माण व्हावा आणि प्रलंबित प्रश्नांना गती मिळावी, हा या बैठकीमागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित नागरिकांनी आपल्या वीजविषयक समस्या, सूचना व तक्रारींसह बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वतीने स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांनी केले आहे.






